मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचे अंंतरवली सराटीत पुन्हा प्राणांतिक उपोषण
– संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवलीत जाऊन घेतली जरांगे पाटलांची भेट
– पंढरपूरसह राज्यभर राजकीय नेत्यांना गावबंदी, निवडणुकांवरही बहिष्कार
छत्रपती संभाजीनगर/ जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने महिनाभराचा कालावधी मागवून घेतला असताना मराठा योद्धे मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला. तरीदेखील सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नसल्याने मनोज जरांगे पाटलांनी अंतरवली सराटी (जि.जालना) येथे आज (दि.२५) पासून पुन्हा एकदा प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली, आणि ४१ दिवस झाले तरी कुठलाही निर्णय घेतला नाही, यावरून राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संतापाची लाट उसळली असून, पंढरपूरसह अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर केली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवलीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवावे यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना फोन करून शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जरांगे पाटलांनी तो उधळून लावला. आरक्षण जाहीर करा, तरच उपोषण सुटेल, असे त्यांनी महाजनांना ठणकावले.
दिनांक २९ ऑगस्टरोजी मराठा समाजाला ओबीसीत सामिल करून सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ सप्टेंबररोजी अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे पाटलांना आरक्षणाचे आश्वासन देत उपोषण सोडले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी टिकणारे आरक्षण हवे असेल तर सरकारला ३० दिवसांचा वेळ द्या, परंतु मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून सरकारला ४० दिवस दिले. या ४० दिवसांत या शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठलीही हालचाल अथवा प्रयत्न केले नाहीत. उलट मराठा समाजाची दिशाभूल केल्याचे दिसून आले. त्यामुळे अखेर मराठा योद्धे मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचे शस्त्र हाती घेतले आहे. हे उपोषण कडक असणार असून, अन्न-पाणी, उपचार काहीच घेणार नाही. सरकारने आरक्षण द्यावे, तर उपोषण सुटेल, असे जरांगे पाटलांनी या सरकारला ठणकावले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्य सरकारची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांनी उलट गिरीश महाजनांनाच महिन्याभरात आरक्षणाचा निर्णय घेणार होता, त्यासाठीच वेळ दिला होता, त्याचं काय झालं? असा जाब विचारत उपोषण न करण्याचा त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.
जरांगे पाटलांना किडण्यांचा त्रास, उपोषणामुळे प्राणाची लावली बाजी!
दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली आणि त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. संभाजीराजे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. संभाजीराजे म्हणाले, मनोज जरांगे पाटील परत एकदा बेमुदत उपोषण करतोय. म्हणून मी त्याला भेटायला आणि त्याच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला इथे आलो आहे. त्याची धडपड मला दिसतेय. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तो हे सगळं करतोय. मी मनोजला अनेक वर्षांपासून बेमुदत उपोषण करताना बघतोय. अनेक वेळा उपोषणामुळे त्याला किडण्यांचा त्रास झाला, बिचार्याला चालताही येत नव्हतं. उपोषणानंतर एक-दोन कार्यक्रमांमध्ये मी त्याला पाहिलं. लोकांचा हात धरून, काठी घेऊन चालायचा. आजच्या काळात समाजासाठी एवढं कोण करतं? त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा वंशज म्हणून मनोजला बळ देण्याची आमची जबाबदारी आहे. मी माझं कर्तव्य समजून इथे आलो आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घेतलेल्या शपथेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेत राहणार होते, पण राहिले का? अशा शब्दांत ठाकरे गटाने त्यांच्या शपथेवर सवाल उपस्थित केला आहे.
शिंदे-फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दुपारी तातडीने दिल्ली दौर्यावर गेलेत. हे दोन्ही नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी दिल्ली गाठल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
————–