Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

भाजपचा अभेद्य किल्ला ढासाळविण्याची महाविकास आघाडीची रणनीती!

– सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघासाठी पवार-शिंदे यांची आज पंढरपुरात बैठक

सोलापूर (हेमंत चौधरी) – सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची संयुक्त बैठक पंढरपूर येथे सोमवारी (दि.२३) घेणार आहेत. या दोन्ही मतदारसंघांवर सद्या भाजपचे वर्चस्व असल्याने हे किल्ले ढासाळविण्यासाठी शिंदे-पवार यांना आपले राजकीय कसब पणाला लावावे लागणार असून, त्यासाठी धोरणात्मक रणनीती आखली जाणार असल्याचे कळते. लोकसभेसोबतच विधानसभा मतदारसंघातही भाजपला सुरूंग लावण्यासाठी व्यापक राजकीय रणनीती आखली जात आहे.
sushilkumar shinde, sharad pawar and his friends love storyसोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर (उत्तर) विधानसभा मतदारसंघातून आमदार विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख हे दोघे भाजपचे आमदार हेत. तर सोलापूर (मध्य)मध्ये काँग्रेसच्या कु. प्रणिती सुशीलकुमार शिंदे या आमदार आहेत. या मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचे वर्चस्व असतानाही त्यांचा पराभव तर झाला होताच, पण काँग्रेसपेक्षा भाजपला ४० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असून, अक्कलकोटला आमदार कल्याण शेट्टी (भाजप), पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक (भाजप) यांचे तर मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांचे वर्चस्व आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या लाटेतही आपली लोकप्रियता टिकवून ठेवली असून, विविध विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे. तथापि, इतर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर लोकांना उत्तरे देताना नाकीनऊ येणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार असून, बबनराव शिंदे व संजय शिंदे यांचे या भागात चांगले राजकीय वर्चस्व आहे. या मतदारसंघात पंढरपूरचा काही भाग व माळशिरस तालुका, सांगोला तालुका हे तालुके येतात. आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सांगोलातून शहाजी बापू पाटील ही आमदारांची फळी भाजपची जमेची बाजू आहे. तर फलटण-माण तालुक्यात खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपच्या दोन बलाढ्य खासदारांना पराभवाची धूळ चारण्याचे मोठे आव्हान शरद पवार व सुशीलकुमार शिंदे या दोन दिग्गज नेत्यांसमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक महत्वाची फळी अजितदादा पवारांसोबत गेल्याने पुढील सर्व निवडणुकांत भाजपला त्याची मोठी राजकीय मदत होणार आहे. त्यामुळे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शरद पवार व त्यांचे शिष्य सुशीलकुमार शिंदे यांना मोठी राजकीय कसरत करावी लागणार आहे. आजरोजी नेते भाजपसोबत असले तरी जनमत मात्र शरद पवार यांच्याच बाजूने आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली तर या दोन्ही मतदारसंघात भाजपला पराभूत करणे पवार-शिंदे यांना शक्य होईल, अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे.

सोमवारच्या शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या दौर्‍याची सर्व जबाबदारी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर सोपावली गेली आहे. अभिजीत पाटील यांच्यावर शरद पवार यांनी सर्वाधिक विश्वास दाखवला असून, त्यांच्याकडेच माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाची व्यूहरचना आखण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे अभिजीत पाटील यांच्यासारख्या तरूण चेहर्‍याला जाणकार शरद पवार यांनी सोलापूरसारख्या राजकीय दिग्गजांच्या जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!