Breaking newsBuldanaHead linesVidharbhaWorld update

अग्निवीर अक्षय गवते पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

– आईसह कुटुंबीयांचा आक्रोश, उपस्थितांचे डोळे पाणावले
– हातात तिरंगा घेऊन शेकड़ो विद्यार्थी, विद्यार्थिनींनीही दिली मानवंदना

बुलढाणा (बाळू वानखेडे) – भारतीय लष्करातील अग्निवीर जवान अक्षय लक्ष्मण गवते (वय २०) यांना सियाचीनमध्ये कर्तव्यावर असताना दि. २० ऑक्टोबररोजी हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले होते. आज, दि. २२ ऑक्टोबररोजी मूळगावी पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिल लक्ष्मण गवते यांनी आपल्या या एकुलत्या एक व लाडक्या लेकाला मुखाग्नि दिला. यावेळी लष्करी जवान व पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी आईसह त्यांच्या कुटुंबीयांनी फोडलेल्या टाहोने उपस्थितांचे ड़ोळे पाणावले होते. तिरंगा हातात घेऊन शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या वीर जवानाला मानवंदना दिली. तसेच, ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून आपल्या या भूमिपुत्राला आदरांजली अर्पण केली. संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते. शोकग्रस्त आप्तगण व देशप्रेमी ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

पिंपळगाव सराई ता. बुलढाणा येथील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते हे सियाचीनमधील ग्लेशियरमध्ये युनिट ६९ मैदानी रेजीमेंटमध्ये टेलीफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. कर्तव्यावर असताना २० ऑक्टोबररोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले होते. काल, २२ ऑक्टोबररोजी त्यांचे पार्थिव घेऊन आलेले विमान छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर उतरले. रात्री त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथील लष्करी रूग्णालयात ठेवण्यात आले होते. आज, दि. २३ ऑक्टोबररोजी सकाळी त्यांचे पार्थिव लष्करी वाहनाने मूळगावी पिंपळगाव सराई येथे आणल्यानंतर पार्थिवाची गावातून परिक्रमा काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाल्याचे दिसले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आप्तेष्ट, नातेवाईक व परिसरातील ग्रामस्थांची एकच रिघ लागली होती. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिल लक्ष्मण गवते यांनी आपल्या या एकुलत्या एक व लाडल्या लेकाला मुखाग्नि दिला. यावेळी पुलगाव जि.वर्धा येथील जवान व पोलीसांनी मानवंदना दिली. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आ.संजय गायकवाड़, आ.धीरज लिंगाड़े, आ. श्वेताताई महाले, माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. विजयराज शिंदे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेड़ेकर, बुलढाणा उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव, तहसीलदार रूपेश खंड़ारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्वॉर्डन लीडर (निवृत्त) रूपालीक सरोदे, सैनिक कल्याण संघटक विष्णू उबरहंड़े आदींसह विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह हजारो नागरिक उपस्थित होते.


देशातील पहिले शहीद अग्निवीर!

अक्षय गवते हे देशातील पहिले शहीद अग्निवीर ठरले आहेत. याआधी कर्तव्यावर असलेल्या पंजाब येथील अग्निवीराला शहीदचा सन्मान मिळाला नव्हता, त्यावर मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अक्षय गवते या अग्निवीराला शहिदाचा सन्मान मिळाल्याने अक्षय गवते हे देशातील पहिले शहीद अग्निवीर ठरले आहे. शहीद अग्नीवीर अक्षयवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना पोलिसांकडून हवेत तीन राऊंड फायर करून सलामी देण्यात आली. इतर सैनिकांना ज्याप्रमाणे शासकीय सुविधा मिळतात त्याच धर्तीवर शहीद अग्निवीर अक्षय गवतेला सुविधा मिळाव्यात यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितले. लष्कराच्या युनीट ६९ मैदानी रेजिमेंटमध्ये ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचिन ग्लेशियर भागात अक्षय गवते कर्तव्यावर होते. सैन्यात ९ महिने २१ दिवस सेवा दिली. २० ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावल्यानंतर मध्यरात्री झोपेतच हृदयाघात झाल्याने अक्षयची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, देशाचा दुसरा अग्निवीर जवान शहीद झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना ग्रॅच्युइटी व लष्करी जवानांना मिळतात त्या सुविधा देणार की नाही, असा सवाल केंद्र सरकारला काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी विचारला आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!