Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsSOLAPURWorld update

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; ६५० गावांची नेत्यांना गावबंदी, निवडणुकीवर बहिष्कार!

– गाठ मराठ्यांशी आहे, आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा ठणकावले!

सोलापूर/जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा सुरू केला असून, राज्यभरातील त्यांच्या दौर्‍यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावलेले आहेत, सरकारने आमच्या परीक्षा पाहू नये, गाठ मराठ्यांशी आहे, आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, असे पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावले आहे. दरम्यान, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास साडेसहाशे गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली असून, निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला आहे. गावांच्या वेशीवर तसे फलक लावले आहेत.
मराठा समाज हा कुणबीच असून, त्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, नोकरी व शिक्षणात आरक्षण द्यावे, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून, पुढील आंदोलनाबाबत ते रविवारी (दि.२२) आपली पुढील रणनीती निश्चित करणार आहेत, असे त्यांनी अकलूज (जि. सोलापूर) येथे पत्रकारांशी बोलताना म्हणालेत. यासाठी अंतरवली सराटी (जि.जालना) येथे मराठा समाजाची व्यापक बैठकदेखील होणार आहे.
दरम्यान, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नेत्यांना गावबंदीसह निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्यातील जवळपास साडेसहाशे गावांनी घेतला आहे. तसे फलक गावांच्या वेशीवर लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यांतील गावांसह जालना जिल्ह्यातील २१५ गावांनी नेत्यांना गावबंदी तर २५ गावांनी मतदानावर बहिष्कार जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९६ गावांनी मतदानावर बहिष्कार तर २५ गावांनी नेत्यांना गावबंदी जाहीर केली. बीड जिल्हा ९३ गावांनी नेत्यांना गावबंदी, नांदेड जिल्हा ८८ गावांचा मतदानावर बहिष्कार व नेत्यांना गावबंदी, हिंगोली जिल्हा ७० गावांचा मतदानावर बहिष्कार, लातूर जिल्हा ३० गावांचा नेत्यांना गावबंदी, धाराशीव जिल्हा १६ गावांची नेत्यांना गावबंदी जाहीर केलेली आहे.

अफगाणिस्तानापर्यंत मराठ्यांनी झेंडे लावले!

सरकाराला समाजाच्या संयमाचा विचार करावा लागेल. आम्ही हटणाऱ्यांपैकी मराठा नाही. अफगाणिस्तानापर्यंत मराठ्यांनी झेंडे लावले आहेत. मराठा तुमचा उलटा-सुलटा कार्यक्रम करतील. सरकारने वेळ घेतला आहे आम्ही दिलेला नाही. आम्ही कायदा सोडून बोलत नाही, मनोज जरांगे पाटलांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!