लोणार (उद्धव आटोळे) – राज्यातील ६२ हजार शाळांचे खासगीकरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी तसेच ८५ विभागातील कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करण्यात या मागणीसाठी तहसील कार्यालय लोणार येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले.
सध्या राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्यावतीने नोकरभरतीत कंत्राटीकरण, खासगीकरण अध्यादेश काढण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या तलाठी, वनरक्षक भरतीमध्येसुद्धा प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. शासनाच्या या हुकूमशाही निर्णयाने राज्याभरातील युवकांमध्ये जनसामान्यामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. तसेच सरळ सेवा भरती, स्पर्धा परीक्षा ह्या खासगी कंपन्यामार्फत न घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्या. स्पर्धा परीक्षा शुल्क सर्वांना १०० रुपये करण्यात यावे. राज्यात वर्षभरात होणार्या विविध स्पर्धा परीक्षांचे शुल्क मध्यप्रदेश धर्तीवर एकच परीक्षा शुल्क आकारण्यात यावे. अश्या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ नेते भाई महेंद्र पनाड यांनी ह्या जाचक शासन निर्णय बहुजन समाजाचे खूप नुकसानकारक असल्याचे प्रतिपादन केले. तसेंच युवा तालुका अध्यक्ष गौतम गवई यांनी बेरोजगार तरुणांनी सहभागी व्हावे, असे आव्हाहन केले. युवा महासचिव पवन अवसरमोल यांनी ह्या सर्व मागण्या मान्य न केल्यास हा लढा अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष दिलीप राठोड,दयानंद कांबळे,समाधान डोके,नितीन नरवाडे,विजय साळवे,अमर निकाळजे,बालाजी नरवाडे,वंदना ससाणे,यशोदा खरात,सर्जेराव मोरे,रोशन अंभोरे,दीपक अंभोरे,उमेश चव्हाण यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.