एकनाथ शिंदे यांचा नक्षल्यांच्या हातून एन्काउंटर करण्याचा होता डाव!
– उद्धव ठाकरेंवरील गंभीर आरोपाने राज्याचे राजकीय वातावरण ढवळले
– संजय गायकवाड खोटारडे, वादग्रस्त बोलण्याची सवयच – आमशा पाडवी
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. ‘एकनाथ शिंदे यांना जाणून बुजून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद दिले गेले’, असे सांगून, गृहमंत्र्यांनी शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असता, त्यांना सुरक्षा न देण्याचे आदेशही ‘मातोश्री’वरून आले होते, असेही आ. गायकवाड यांनी सांगितले. तथापि, शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून मात्र आ. गायकवाड हे खोटारडे असून, त्यांचे आरोप हे खोटारडेपणाचा कळस असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. संजय गायकवाड यांनी नेहमीप्रमाणे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, नक्षलवाद्यांकडून ज्यावेळी धमक्या आल्या, तेव्हा मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी सुरक्षा पुरवली जात असताना मातोश्रीहून सुरक्षा न पुरवण्यासाठी फोन आला.” ‘मातोश्री’हून हा फोन ठाकरेंनीच केल्याचा दावादेखील आ. गायकवाड यांनी केला. ‘एकनाथ शिंदे यांना जाणून बुजून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद दिले गेले’, असा खळबळजनक आरोपही त्यांनी याप्रसंगी केला.
अन् ‘मातोश्री’तून फोन आला!
एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शंभुराजे देसाई गृहमंत्री होते. त्यांच्या घरी बैठक सुरू होती. मातोश्रीवरून फोन आला. त्यांना सुरक्षा देऊ नका. याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपलेले होते असेच ना? शिंदे राजकारणातून खतम होत नाही म्हणून त्यांना नक्षल्यांच्या हातून मारणार होते. म्हणून तुम्ही त्यांना सेक्युरीटी नाकारली, असा दावाच गायकवाड यांनी केला आहे.
आ. संजय गायकवाडांचे आरोप खोटे – आमशा पाडवी
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आमशा पाडवी यांनी संजय गायकवाड यांचे आरोप खोटे असल्याचे सांगून, शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मीसुद्धा एक जिल्हाप्रमुख होतो. त्यावेळी आम्ही शिंदे यांच्याकडे जायचो. कारण त्यावेळी सगळ्या जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या माणसाला ठाकरे असा घातपात करतील का, हे सगळे आरोप खोटे आहेत, असे पाडवी यांनी सांगून, आ. गायकवाड यांना वादग्रस्त विधाने करण्याची सवयच आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
————–