खामगाव (संदीप राठोड) – तालुक्यातील लाखनवाडा जयरामगड रोडवर जंगलालगत असलेल्या शेतात काम करत असतांना शेतात लपलेल्या रोहीच्या पिल्लावर कुत्र्यांनी हल्ला चढवला. कुत्रे मागे लागल्याने रोहीचे पिल्लू जिवाच्या आकांताने पळत सुटले. त्याच शेतात काम करीत असलेल्या मजुरांना रोहीच्या पिल्लाचे आवाज येताच सर्व मजूर त्या पिल्लाला वाचविण्यासाठी आवाज येणार्या दिशेने पळाले. जिवाच्या आकांताने धावणार्या पिल्लाला शेतमजूर व वन्यजीव प्रेमींनी कसेबसे कुत्र्यांच्या तावडीतून वाचविण्यात यश आले.
तिथे शेतातच काम करीत असलेले पत्रकार संदीप राठोड व गावातील तुलसीदास राठोड यांनी वनपाल यांना भ्रमणधवनीवर संपर्क साधून त्यांना तातडीने बोलावून घेऊन रोहीच्या त्या पिल्लाला जखम झालेल्या ठिकाणी मलम पट्टी करून त्या पिल्लाला जंगलात सुखरूप सोडण्यात आले. कुत्र्यांच्या तावडीतून सोडविणारे वन्यप्राणी प्रेमी युवामंडळीमध्ये प्रामुख्याने विनोद जाधव,राजेश ठक,महादेव वावगे,संजय ठक, अमरदिप राठोड,गणेश जाधव, प्रविण अढाव, सुनिल ठक,विजय राठोड (भोला) अविनाश ठक यांचा समावेश होता. या वन्यजीव प्रेमींनी अथक प्रयत्न करून पिल्लाला सोडविले व तसेच वनपाल पी.के.गवई, शिपाई कारेगावकर (लाखनवाडा खु.) शिपाई नायकोडे (पिंपरी धनगर) यांनी रोहीच्या पिल्लाला मलम पट्टी करून जंगलात सोडून दिले.