– बुलढाण्यात जिवाजी महाले यांचा जयंती कार्यक्रम उत्साहात!
बुलडाणा (संजय निकाळजे) – स्वत:च्या जिवाची पर्वा न करता स्वराज्याचा क्रांतिकारी विचार देणारे शिवराय हेच सर्वस्व मानून जिवाजीचा पराक्रम घडला. त्यांच्या चरित्रावरुन प्रखर देशकार्याची प्रेरणा सदोहीत मिळत राहील, असे प्रतिपादन शिवजयंती उत्सव समितीचे सचिव सुनिल सपकाळ यांनी केले. शिवजयंती उत्सव समितीच्या चिंचोले चौक येथिल शिवाज्ञा कार्यालयात नरवीर जिवाजी महाले जयंती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.शोण चिंचोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव सुनिल सपकाळ, अॅड.नंदकिशोर साखरे, प्रा.जगदिशराव बाहेकर, डॉ.मनोहर तुपकर, पत्रकार गणेश निकम, प्रा.अमोल वानखेडे, गजानन नाईकवाडे, सचिन सुस्ते, बिडवे काका आदींची उपस्थिती लाभली.
यावेळी सुनिल सपकाळ यांनी जिवाजी महालेंच्या कार्यकर्तुत्वाचा आलेख मांडला. शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे राहिले ते प्रामाणिक सवंगड्यांच्या जोरावर. देशप्रेमाची प्रखर भावना असणारे नरवीर जिवाजी महाले प्रखर राष्ट्रभक्तीचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तिंचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने सन्मान केला जातो. या कार्यक्रमात अॅड.नंदूभाऊ साखरे, रवि पाटील, सचिन सुस्ते, राजेंद्र काळे, आदींना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संचलन प्रा.गोपालसिंग राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र काळे यांनी मांडले. शिवजयंती समितीचे कार्य केवळ शिवजयंती या एकादिवसापुरते मर्यादीत न ठेवता वर्षभर अठरापगड जाती धर्माच्या महापुरुषांच्या जयंतीचे आयोजन केल्याबद्दल डॉ.शोण चिंचोले यांचाही सत्कार मान्यवरांनी केला.
जिवाजींचे ऋण फेडता येणार नाही – डॉ.शोण चिंचोले
शिवाजी महाराजांचा रोमांचकारी इतिहास वाचतांना सर्वात रोमहर्षक प्रसंगी जिवाजी महाराज धावून आल्याचे दिसते. काही क्षण जरी दिरंगाई झाली असती तर शिवरायांच्या जिवावर बेतले असते. म्हणूनच होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असे म्हटले जाते. जिवाजी यांच्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीमुळेच स्वराज्य उभे राहिले असे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोण चिंचोले यांनी सांगून जिवाजींच्या पराक्रमावर प्रभावी भाष्य केले. यावेळी प्रा.अमोल वानखेडे, राजेंद्र काळे, गणेश निकम यांनी विचार मांडले.