– उमरद झेडपी शाळेत विविध शालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात
किनगावजट्टू (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास झाला तर देशाला खर्याअर्थाने सक्षम नागरिक मिळतील. गावाचा सर्वांगिण विकास घडविण्यासाठी शाळा महत्वाची असते, असे प्रतिपादन उमरद जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठोबा चित्ते यांनी केले. तर, आजचा विद्यार्थी हा भावी नागरिक असल्याने तो सर्वगुण संपन्न व चारित्र्यसंपन्न कसा निर्माण करता येईल, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन याप्रसंगी ग्रामसेवक विनोद सातपुते यांनी व्यक्त केले.
सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील ग्रामपंचायतीने स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या माध्यमातून मराठी प्राथमिक शाळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच सौ. निर्मला पंढरीनाथ उबाळे यांच्याहस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला आनंदीबाई शिनगारे, प्रभाकर देशमुख, संतोष गिरी, मनोहरराव देशमुख, विठ्ठल भांबर्गे, पंढरी उबाळे, देवानंद केकान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उबाळे, दत्तू सानप, राजू शिंगारे, ग्रामसेवक विनोद सातपुते, शाळेचे मुख्याध्यापक विठोबा चित्ते यांच्यासह सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका मदतनीस, हजर होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्रीधर जायभाये यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक नागरे यांनी केले. यावेळी संतोष गिरी, ग्रामसेवक सातपुते, मुख्याध्यापक चित्ते यांनी आपले विचार मांडले. या विविध स्पर्धांत विद्यार्थी, विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.