Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMarathwadaPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update

अजितदादांच्या आजारपणाची मात्रा लागू!; चंद्रकांत पाटलांकडून पुणे, गुलाबराव पाटलांकडून बुलढाण्याचे पालकमंत्रीपद काढले!

– अजितदादा पवार गटाच्या सात मंत्र्यांना मिळाले पालकमंत्रीपद; महामंडळ वाटपाचा तिढाही लवकरच सुटणार?

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यातील १२ जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्यात आले असून, अजित पवार गटाच्या सात जणांना पालकमंत्रीपदी संधी मिळाली आहे. पुण्यात अजितदादांनी भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर यशस्वी कुरघोडी केली असून, पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासाची धुरा अजित पवारांच्या हातात असणार आहे. तर बुलढाण्याचे पालकमंत्रीपद अजितदादा गटाचेच मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. गुलाबराव पाटील हे बुलढाण्याचे पालकमंत्री असताना ते जिल्ह्याकडे फिरकतही नव्हते. त्यामुळे त्यांच्याबद्दल तीव्र असंतोष होता. आता वळसे-पाटील यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. आजारी असल्याचे सांगून अजितदादांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली होती. दादांच्या या आजारपणाची मात्रा चांगलीच लागू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, दिलीप वळसे पाटील हे उद्या (दि.5) बुलढाणा येथे जात असून, ते प्रशासकीय आढावा बैठक घेणार आहेत.

Maharashtra politics: Ajit Pawar guardian minister of Pune, list of 11 other districts announcedअजित पवार गटातील मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यासाठी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांना त्यांचे पूर्वीचे जिल्हे सोडून नवीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. कोल्हापूरवरून पुण्याला आलेल्या चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिलेली असून, महायुतीत समाविष्ट झालेल्या अजित पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी ही यादी जाहीर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर आता तिन्ही पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीसाठी भाजपने महामंडळ वाटपाचे सूत्र निश्चित केले आहे. तर, शिंदे गटाने या प्रस्तावाला पर्याय देत आपला प्रस्ताव दिला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने जेवढी महामंडळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील, तेवढीच महामंडळे आपल्याला मिळावी, असा आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या आठवड्यात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर तब्बल दोन तास एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्रीपदे व महामंडळांचे वाटप यावर चर्चा झाली असल्याची माहिती होती. त्यानंतर शिंदे – फडणवीस हे अचानक दिल्लीला गेले. दिल्लीतून त्यांनी पालकमंत्रीपदे व महामंडळांचे वाटप यावर शिक्कामोर्तब करून आणले असल्याचे सांगण्यात आले.


  • १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी –
  • पुणे – अजित पवार
  • अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
  • सोलापूर – चंद्रकांतदादा पाटील
  • अमरावती – चंद्रकांतदादा पाटील
  • वर्धा – सुधीर मुनगंटीवार
  • भंडारा – विजयकुमार गावीत
  • बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
  • कोल्हापूर – हसन मुश्रीफ
  • गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
  • बीड – धनंजय मुंडे
  • परभणी – संजय बनसोडे
  • नंदूरबार – अनिल भा. पाटील
    ————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!