ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून मराठवाड्यातील मुकादमांना लाखोंनी लुबाडले!
– तब्बल १२ लाख ६० हजाराने लावला चुना, कोर्टाने दिली आठ दिवसांची पोलिस कोठडी
बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो असे सांगून, अॅडव्हास घेतला. परंतु, उसतोडणीसाठी मजूर न पाठविता पैसे हडप केले. अशा प्रकारे मराठवाड्यातील मुकादमांची आर्थिक फसवणूक करणार्या बिबी व खापरखेडा घुले येथील आरोपींविरोधात बिबी पोलिसांत विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना जेरबंद केले आहे. न्यायालयाने या आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या आरोपीने मराठवाड्यातील अनेक मुकादमांना अशाप्रकारे गंडवले असल्याचे निदर्शनास येत आहे.
सविस्तर असे की, अमोल वैजनाथ शिंदे वय वर्ष ३३, धंदा शेती, रा. रायमोहा ता. शिरूर कासार जि. बीड यांच्याकडून पोलीस स्टेशन बिबी येथील रहिवासी असलेला गोविंद चव्हाण व खापरखेडा घुले येथील राजू राठोड यांनी १६ सप्टेंबर २०२२ मध्ये साखर कारखान्याला उसतोड मजूर पुरवण्यासाठी १२ लाख ६० हजार रुपये घेतले. मात्र ऊस तोडणीसाठी मजूर पाठविलेच नाही. सदर फिर्यादीची फसवणूक केलेल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपीविरुद्ध दिनांक २ ऑक्टोबररोजी गुन्हा दाखल केला व दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयामध्ये उभे केले असता दोघांनाही न्यायालयाने आठ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. बीड जिल्ह्यातील अमोल बैजनाथ शिंदे यांच्याकडे एक ट्रॉलीसह ट्रॅक्टर असून ते कंचेस्वरा शुगर लिमिटेड, मंगरूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद या साखर कारखान्याला ट्रॅक्टर व उस तोडीचे मजुरासह उस वाहतुकीसाठी कारखान्याला लावतात. २०२२ वर्षाचे हंगामातील त्यांनी कारखान्यासोबत करार करून उसतोडीचे मजूर आणण्यासाठी कारखान्याकडून पैसे घेतले व काही जवळचे पैसे असे घेऊन मजुरांना पाहण्यासाठी माहे सप्टेंबर २०२२ मध्ये ते व अनुरोध भगवान सानप, बाबू बादशहा पठाण, दोन्ही राहणार तागडगाव, जि. बीड व सुनील मच्छिंद्र कुळसकर राहणार वडारवाडा, तालुका शेवगाव, जि. अहमदनगर असे चौघे मिळून बिबी येथील गोविंद रामधन चव्हाण व वसंत विश्वनाथ चव्हाण यांना बिबी येथे येऊन भेटले. त्यांच्याशी १४ ऊसतोड जोडीसंदर्भात उसतोड मजूर मिळण्याकरिता बोलून गोविंद रामधन चव्हाण, वसंत विश्वनाथ चव्हाण यांनी आम्हाला ऊस तोडीसाठी १४ जोडी पुरवितो, असे आमच्यात ठरले व दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता मलकापूर पांगरा रोडवर बिबी येथील मोंढ्यामध्ये अमोल वैजनाथ शिंदे याने नगदी तीन लाख ४८ हजार ३३३ रुपये तसेच बाबू बादशहा पठाण यांच्याकडून नगदी २ लाख १५ हजार रुपये अनुरथ भगवान सानप यांच्याकडून नगदी तीन लाख ४८ हजार ३३३ रुपये, सुनील मच्छिंद्र कुसळकर यांच्यामार्फतीने मी तीन लाख ४८ हजार ३३३४ असे एकूण १२ लाख ६० हजार रुपये रोख नगदी प्रत्येकी जोडी मजूरकरिता ९० हजार रुपये प्रमाणे गोविंद रामदास चव्हाण, वसंत विश्वनाथ चव्हाण यांच्या हाताने दिले व गोविंद रामदास चव्हाण व वसंत विश्वनाथ चव्हाण यांनी आम्हाला व अमोल शिंदेला चार उसतोडी मजूर सात लाख रुपये घेऊन मजूर कामाला न पाठविता त्याचाही राज प्रल्हाद राठोड राहणार खापरखेड घुले यांनी विश्वासघात करून फसवणूक केली आहे. तसेच मुकादम वंदन बळवंत थिट, राहणार आर्णी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद यांनासुद्धा राजू प्रल्हाद राठोड व त्यांचे साथीदाराने राहणार खापरखेड घुले, ता. लोणार जि. बुलढाणा यांनी ऊसतोड मजूर पुरवतो असे म्हणून दिनांक ४ नोवेंबर २०२२ रोजी त्यांच्यासोबत मजुरांकडून करार करून घेऊन मजुरांची नावे सांगून हे पुरवतो असे त्यांना विश्वास देऊन त्यांच्याकडून मजुराचे कामाचे अॅडव्हान्स नगदी स्वरूपात एकूण १ लाख ३५ हजार रुपये घेऊन मजुराला कामाला न पाठविता त्यांचाही राजू प्रल्हाद राठोड, रा. खापरखेड घुले यांनी विश्वासघात करून फसवणूक केली.
नमूद आरोपी यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना ऊसतोड करण्यासाठी मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रुपये आम्हाला विश्वासात घेण्यासाठी मजुरांसोबत नोटराईज करारनामे करून मजूर ऊसतोडीसाठी पाठविले नाही, असा रिपोर्ट दिला होता. यावरून बिबी पोलिसांनी अप नंबर १७३/२०२३ कलम ४२० /४०६ /३४ भांदवीप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी गोविंद रामदास चव्हाण वय वर्ष ४६, राहणार बिबी, राजू प्रल्हाद राठोड वय वर्ष ३७, राहणार कापडगेट घुले यांना दिनांक १ ऑक्टोबररोजी अटक करण्यात आली असून, दिनांक २ ऑक्टोबर रोजी लोणार न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलिस कॉन्स्टेबल अरुण सानप, पोकॉ यशवंत जैवळ हे करत आहेत.