रात्र अंकिताच्या आर्त किंकाळ्यांनी; सकाळ वर्धेकरांच्या अश्रूंनी भिजली!
– दहेगाव (गोसावी) गावातील हादरविणारी घटना
– चार जण पोलिसांच्या ताब्यात, यात दोन मुलींचाही समावेश
वर्धा (प्रकाश कथले) – सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी गावात क़ाल रात्री अंकिता सतिश बोईलबोडे (वय २३) हिचा तिच्या घराच्या आवारातच चाकूचे सपासप वार करून खून करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या अंकिताला रुग्णालयात दाखल केले होते. पण चाकूचे वार खोलवर असल्याने तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने दहेगाव गोसावी गाव हादरून गेले. अंकिताचा खून करून पळ काढणार्या चौघांना गावातील नागरिकांनी पाठलाग करून जुनोना गावाजवळ ताब्य़ात घेतले. चारही जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार जणांपैकी दोन मुली आहेत. अंकिताच्या खुनाचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी ज्या क्रूर पद्धतीने अंकिताचा खून करण्यात आला, त्यातून जनमानस हादरले आहे. नागरिकांत खून करणार्यांबाबत संतापाची लाट आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन रात्रीच घटनास्थळी गेले होते. काहींच्या म्हणण्यानुसार दहेगावच्या अंकिताचाही एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला, मिळालेल्या माहितीनुसार यातील सहभागी आणखी एक फरार आहे. दोन्ही मुली दोन युवकांसोबत दुचाकीने दहेगावला गेले होते. खून करणारे २३ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत. पोलिसांच्या ताब्यातील तीन जण वर्ध्याचे रहिवासी असून एक मुलगी नालवाडीची रहिवासी असल्याची माहितीही समोर येत आहे.
हे सर्व जण तोंडावर कापड बांधून होते. ते अंकिताच्या घरचे मागील फाटक उघडून सरळ आत शिरले. रात्री ८ वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे. अंंकिताचा फाटक उघडल्याचा आवाज आल्यानंतर ती बाहेर येताच काहीही वेळ न गमावता तिच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करण्यात आले. अंकिताने आरडाओरडा करताच तिची आई बाहेर आली. तिच्या घरच्यांनी तसेच गावातील नागरिकांनी अंकिताला सेवाग्रामच्या रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. जुनोना येथे पकडलेल्या चारही जणांना नागरिकांनी दहेगाव पोलिस ठाण्यात आणले. तेथे नागरिकांचा जमाव जमला होता. त्यातील एका मुलीने आम्हाला जबरदस्तीने सोबत नेले होते, असे सांगितले असले तरी खरी बाब पोलिसांच्या तपासात अधिक स्पष्ट होणार आहे.
घरातील टाईल्सवर रक्ताचे डाग पडले होते तसेच केसाचे पुंजके पसरलेले होते. यातून त्यांच्यात झटापट झाल्याचेही स्पष्ट होते. घटनास्थळी पोलिसांना एक बे्रसलेट मिळाली, ती कोणाची होती, हेही स्पष्ट झाले नाही. पकडलेल्या मुलीला पोलिसांनी तुम्ही अंगावर ओळखू न येण्यासारखे कपडे कां घातले होते, असे विचारले, त्यावर एक मुलगी टाळाटाळीचे उत्तर देत होती. खून झालेली अंकिता ही वर्ध्यात शिक्षण घेत होती. या खुनाच्या घटनेमागे नेमके कारण काय, हे स्पष्ट झाले नसले तरी काहींच्या म्हणण्यानुसार ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली. पोलिसांच्या तपासानंतर सगळ्या बाबी स्पष्ट होणार आहे. हिंगणघाट येथे प्राध्यापक असलेल्या अंकिता पिसुड्डे हिचाही खून अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळत एकतर्फी प्रेमातूनच करण्यात आला होता. या घटनेला चार वर्षांचा कालावधी होत असताना आणखी एका अंकिताचा तिच्या घराच्या आवारात शिरून खून करण्यात आला. पोलिसांचा तपास सुरू आहे.