AURANGABADBreaking newsHead linesMaharashtraMarathwadaWorld update

नांदेड, संभाजीनगरमधील शासकीय रूग्णालयांत मृत्यूंचे तांडव; ४८ तासांत ४१ रूग्णांचे जीव गेले!

– शरद पवारांसह विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका, आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
– वेळेवर औषधी पुरवठा न झाल्याने बळी गेल्याचा संशय!

नांदेड/छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयांत गेल्या ४८ तासांत ४१ रूग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली असून, विरोधकांनी सरकारला धारेवर धरत, या आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. नांदेड येथे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर काल रात्री पुन्हा सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यात चार बालकांचा समावेश होता. तर, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वेळेवर औषधी पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या २४ तासात, २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे नांदेडकडे रवाना झाले होते. ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत या रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये १२ नवजात शिशुंचाही समावेश होता. गेल्या दोन दिवसात अंतिम अवस्थेतले अत्यवस्थ रुग्ण नांदेड आणि इतर जिल्ह्यातून येण्याचे प्रमाण वाढले असून डॉक्टर आणि इतर कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत, असे या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले आहे. दरम्यान, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनीही काल रुग्णालयाला भेट दिली. दुसरीकडे, या रुग्णांच्या मृत्यूची सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ही घटना धक्कादायक असून याची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती दिली असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनंतर राज्यभरातील यंत्रणा सतर्क झाल्या असून, या घटनेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. औषधांचा तुटवडा असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

बालकांसह रूग्णांच्या शासकीय रूग्णालयांतील मृत्यूची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी ट्विट करत नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयांतील मृत्यूंबाबत संताप व्यक्त केला आहे.


हाफकीन संस्थेने औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले जात असून, नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या ४८ तासांत ३१ रूग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाल्यावर काल पुन्हा ७ जणांचा बळी गेला. मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत २ शिशूंसह १० रुग्ण दगावले आहेत. नांदेड आणि घाटी रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतरही आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवरच आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!