– सत्ताधारी सत्तेच्या नशेत मस्त, विरोधक सुस्त, शेतकरी नेतेही झोपले! शेतकर्यांना वाली कोण?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – ‘एलोमोझॅक’सह इतरही विषाणूहल्ला झाल्याने सोयाबीन पिवळे पड़ून वाळत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. राज्य शासनाने राज्यातील ‘एलोमोझॅक’सह इतर व्हायरसमुळे नुकसान झालेल्या राज्यातील नऊ जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दि. ३ ऑक्टोबररोजी संबंधितांना दिले. मात्र लाखो हेक्टरवरील सोयाबीन पिवळे पड़ून वाळलेले असतानाही बुलढाणा जिल्ह्याला पंचनामे करण्यातून वगळले असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करित आहेत. असे असताना सत्ताधारी मात्र सत्तेत मस्त असून, विरोधक मात्र याबाबत सुस्त असल्याने व स्वतःला आंदोलन सम्राट म्हणून घेणारे शेतकरी नेतेही झोपल्याने आता शेतकर्यांचा वाली कोण? असा रास्त सवाल विचारला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन हे मुख्य पीक असून, जिल्ह्यातील साड़ेसात लाख हेक्टरपैकी बहुतांश क्षेत्रावर सोयाबीन पेरली गेली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे हातातील पीक गेले. उन्हाळ्यात जिल्ह्याला अतिवृष्टीने झोड़पल्याने रब्बी व उन्हाळी पीकही हातातून निसटले. त्यामुळे खरी मदार खरिपाच्या सोयाबीन मुख्य पिकावर होती. कर्ज काढून शेतकर्यांनी महागमोलाचे बियाणे पेरले. पण पाऊस उशिरा आला तोही जेमतेम. जुलै महिन्यातही पाऊस कमीच पड़ला. त्यातही घाटावर पाऊस खूपच कमी. ऑगस्ट महिना तर कोरड़ाठाक गेला. याच महिन्यात घाटाखाली ढगफुटीसदृश पाऊस पड़ल्याने होत्याचे नव्हते झाले. तर धरणाच्या पाणीसाठ्यातही पाहिजे तशी वाढ झाली नाही. पावसाचा मोठा खंड़ पड़ल्याने सोयाबीन पिकावर एलोमोझॅकसह इतर बुरशीजन्य रोगाने हल्ला केला. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन पीक नेस्तनाबूत झाले असून, सोयाबीन सोंगण्याच्याही कामी राहिले नाही. या भयानक रोगाने हल्ला केल्यामुळे राज्यातील चंद्रपूर, नागपूर, गड़चिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर नांदेड व वाशिम या नऊ जिल्ह्यातील सोयाबीन पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दि. ३ ऑक्टोबर रोजी मदत व पुनर्वसन व कृषी विभागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिले.
असे असताना बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात याच रोगामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असताना जिल्ह्याला मात्र यातून वगळले असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्याने विम्याची मदत वेळेत मिळणे शक्य व्हावे म्हणून पंचनामे करणे गरजेचे आहे. याबाबत सत्ताधारी अनभिज्ञ व सत्तेत मस्त असून विरोधकही सुस्त असल्याने शेतकर्यांचा वाली कोण, असा रास्त सवाल विचारला जात आहे. तरी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी याकड़े जातीने लक्ष देवून शेतकर्यांला धीर द्यावा, अशी मागणी होत आहे.