स्वातंत्र्यानंतर जिजाऊंच्या पाच लेकींचा विधानसभेत घुमला आवाज!
बुलढाणा (गणेश निकम) – मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा हा जिजाऊंच्या रुपाने स्त्री शक्तीचा आदर्श म्हणून ओळखला जातो. तसाच तो आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदेच्या कार्यकर्तृत्वानेही ओळखला जातो. याच मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याने १९६२ पासून २०१९ पर्यंत पाच जिजाऊंच्या लेकींना विधानसमेत पोचविले आहे. या महिलांनी आमदार म्हणून आपआपल्या विधानसभा क्षेत्राचे दमदार प्रतिनिधीत्व केले. यामध्ये १९६२ मध्ये इंदिराबाई कोटंबकर, १९६७ मध्ये सुमनताई पाटील, १९८० मध्ये श्रध्दा टापरे , १९९५ मध्ये रेखाताई खेडेकर तर २०१९ मध्ये श्वेता महाले यांचा समावेश आहे.
राजकारणात जेंव्हा १०० टक्के पुरुष आणि पुरुषांची मक्तेदारी होती. स्त्री जेंव्हा चुल आणि मुल एवढीच जबाबदारी सांभाळत होती, त्या काळात म्हणजे १९६२ मध्ये बुलडाणा विधानसभा क्षेत्रातून इंदिराबाई कोटंबकर यांनी आपली धाडसी उमेदवारी काँग्रेसकडून दाखल केली. त्यांना जनसंघाचे दामोदर झिप्रा वराडे यांनी आव्हान दिले. यामध्ये इंदिराबाईंनी दणदणीत विजय मिळवित बुलढाणा विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच जिल्ह्यातील पहिल्या महिला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत गेल्या. मात्र १९६७ मध्ये त्यांनी उमेदवारी दाखल केली नाही. त्यांच्या जागी काँग्रेसने पुन्हा महिलेलाच संधी देत बुलडाणा विधानसभेसाठी सुमनताई पाटील यांना पुढे आणले. मूळ घाटाखालील असणार्या सुमनताईंनी ही निवडणूक लढली. त्यांच्या विरोधात पुन्हा जनसंघाचे दामोदर झिप्रा वराडे लढले. यात २७०१६ मते घेवून सुमनताई पाटील विजयी झाल्या. त्यांनीही पाच वर्ष बुलडाणा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. मात्र पुढच्या वेळेस त्या राजकारणापासून अलिप्त राहिल्या.
जलंब मतदारसंघात श्रद्धा टापरे यांचे प्रतिनिधित्व
बुलढाणा विधानसभा क्षेत्राप्रमाणेच जलंब मतदार संघानेही स्त्री शक्तीच्या रुपाने श्रध्दाताई टापरे यांना विधानसभेत पाठविले. १९८० आणि १९८५ अशा सलग २ वेळा त्यांनी जलंब मतदार संघाचे नेतृत्व केले. १९८० मध्ये कॉंग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात शेकापचे माणिकराव पाटील लढले. श्रध्दा टापरे यांना २८००८ तर माणिकराव पाटील यांना १९१९७ मते मिळाली. १९८५ च्या निवडणुकीत त्यांच्या विरुध्द शेकापने माणिकराव पाटील यांच्या एवेजी गजाननराव देशमुख यांना उतरविले. यावेळी टापरे यांना ३३५३७ तर देशमुख यांना ३२७१९ मते मिळाली.या नंतर मात्र त्या राजकारणात फ़ारश्या सक्रिय राहिल्या नाही.
चिखली मतदारसंघात रेखाताई खेडेकर
१९९५ मध्ये रेखाताई खेडेकर यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविली. १९९५ ची निवडणूक त्या जिंकल्याच, परंतु पुढे दोन पंचवार्षिक पुन्हा त्यांनी चिखलीचे प्रतिनिधीत्व केले. १९९५ मध्ये भारिपचे प्रताप राजपूत तर १९९९ मध्ये पुन्हा प्रताप राजपूत अशी लढत झाली. यात रेखाताई विजयी झाल्या. २००४ मध्ये काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी त्यांना तगडे आव्हान दिले. मात्र या निवडणुकीतही रेखाताई विजयी झाल्या, त्यांनी सलग १५ वर्ष चिखली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. रनिंग आमदार असतांना भाजपने त्यांना पुढे उमेदवारी दिली नाही. आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा असून राजकारणात सक्रिय आहे.
चिखलीची धुरा श्वेता महालेंच्या हाती
चिखली विधानसभा क्षेत्रात रेखाताई खेडेकर यांच्यानंतर महिला प्रतिनिधी म्हणून श्वेताताई महाले पाटील पुढे आल्या. राहुल बोंद्रे यांचा पराभव करून सध्या त्या विधानसभेत कार्यरत आहे. १९६२ ते २०१९ पर्यंत पाच महिला प्रतिनिधींना विधानसभा प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली.
- इंदिराबाई कोटंबकर १९६२ भाराकाँ, बुलडाणा मतदार संघ
- सुमनताई पाटील १९६७ भाराकाँ,बुलडाणा मतदार संघ
- श्रध्दा टापरे १९८० भाराकाँ जलंब मतदार संघ
- श्रध्दा टापरे १९८५ भाराकाँ,जलंब मतदार संघ
- रेखाताई खेडेकर १९९५ भाजपा,चिखली मतदार संघ
- रेखाताई खेडेकर १९९९ भाजपा,चिखली मतदार संघ
- रेखाताई खेडेकर २००४ भाजपा,चिखली मतदार संघ
- श्वेताताई महाले २०१९ भाजप,चिखली मतदार संघ
नारीशक्ती विधेयक संसदेत पारित झाले. महिलांना आरक्षण देऊन राजकारणात सक्रिय स्थान देण्याचा प्रयत्न होत आहे. बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास स्वातंत्र्यानंतर पाच सक्षम महिलांनी राजकारणाचा फड गाजविण्याची दांडगी हिम्मत केली आहे. त्यातही चिखली विधानसभा मतदारसंघात दोन महिलांना तब्बल वीस वर्षे राजकारणाची संधी मिळाली. बुलढाण्याच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला आमदार होण्याचा मान इंदिराबाई कोटंबकर यांना जातो. तेंव्हाचे खासदार पंढरीनाथ पाटील यांच्या चलतीच्या काळात त्यांनी जवळच्या नात्यातील इंदिराबाईंना पुढे आणले. फारसे परिचित नसलेल्या इंदिराबाई पंढरीनाथ पाटलाच्या वरदहस्ताने एकदम प्रकाशात येऊन १९६२ मध्ये जिल्ह्यातील पहिल्या आमदार बनल्या.