पिंपळगाव सराई, रायपूर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; नदीला पूर, बुलढाण्याशी संपर्क तुटला!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यासह नजीकच्या पिंपळगाव सराई, रायपूर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. पिंपळगाव सराई-रायपूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या भागातील गावांचा बुलढाणा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने या भागात जनजीवन भयभीत झालेले असून, प्रशासनाने सतर्क राण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे १२५ घरांची पडझड, तर ७६ जनावरे वाहून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मुसळधार पावसाने नांदुरा तालुक्यातील लोणवाडी गावातील नदीला आलेल्या पुरात काठावर बांधलेल्या ११ जनावरांचा मृत्यू झाला. तसेच नदीवर असलेला लघुसिंचन प्रकल्प भरला आहे. त्यामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये शेती ही खरडून गेल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुलढाणा व चिखली तालुक्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे, हा पाऊस अचानक दणादण पडला. यामुळे नदी- नाले भरून गेले असून, पिंपळगाव सराई, रायपूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जवळपास या रस्त्यावरील चार तासापासून वाहतूक ठप्प झाली होती. हे वृत्तलिहिपर्यंत रायपूर नदीवरील पुलावरून पाणी वाहात होते, त्यामुळे बुलढाणा तालुक्याशी या परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता.
————-