चिखली (महेंद्र हिवाळे) – भरधाव मिक्सर टिप्परने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. पिंपळगाव सराई- सैलानी रस्त्यावर गोंधळीवरील मारूती मंदिराच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्देवी घटना घडली. जखमी महिलेला बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सविस्तर असे, की बुलढाणा तालुक्यातील पिंपळगावसराई- सैलानी रस्त्यावर गोंधळी वरील मारुती मंदिराच्यासमोर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे सामान वाहून येणार्या मिक्सर टिप्परने या दुचाकीला भरधावपणे धडक दिली. त्यामध्ये मृतक संजय तुकाजी हाडे वय पन्नास वर्षे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तसेच त्यांची पत्नी रंजना संजय हाडे वय ४५ वर्ष या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे पती-पत्नी राहणार मोहगाव हाडे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथील आहेत. घटनास्थळावर रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दुर्गेश राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सावळे, ऋषिकेश पालवे, अरुण झाल्टे यांनी भेट देऊन घटनास्थळी मदत कार्य राबवले. अपघातातील जखमी महिलेला तातडीने बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की मिक्सर टिप्पर खाली मोटरसायकल संपूर्ण चुरा झाली होती. मोटारसायकल व मिक्सर टिप्पर रायपूर पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. हे वृत्तलिहिपर्यंत रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता.