लोकसभेसाठी भाजपचे ‘मिशन-४५’; आ. आकाश फुंडकर अकोल्यातून, विजयराज शिंदे बुलढाण्यातून लढणार?
– लोकसभा निवडणुकीची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार!
मुंबई/बुलढाणा (प्राची कुलकर्णी) – सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागला असून, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला आहे. त्यासाठीच या दोन नेत्यांचे मागील काही दिवसांत महाराष्ट्राचे दौरे झालेत. सुमार कामगिरी असणार्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असून, या निवडणुकीची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे, खामगावचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांना अकोल्यातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात उभे करण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.
मागील काही दिवसांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरे करून राज्यातील खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. यातील सुमार कामगिरी करणार्या खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्या जागी भाजप नव्या चेहर्यांना संधी देऊ शकते. येत्या काही दिवसांतच यावर चर्चा होऊन त्या नावांची यादी समोर येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन ४५’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मिशन अंतर्गत चंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार, जळगावच्या रावेरमधून गिरीश महाजन, वर्धामधून चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर किंवा रवींद्र चव्हाण, दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर, अकोल्यातून अॅड. आकाश फुंडकर तर मुंबईतून विनोद तावडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर लोकसभेची उमेदवारी ठरणार आहे. तसेच, बुलढाणा लोकसभा मतदारसंघही भाजपला हवा असून, येथून विजयराज शिंदे किंवा शेतकरी नेते रविकांत तुपकर हे भाजपात आले तर तुपकर हे भाजपचे उमेदवार राहू शकतात.
सद्या तरी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर लोकसभेसाठी उमेदवारी देताना, जिंकून येण्याची क्षमता हा एकमेव निकष निश्चित करण्यात आलेला आहे. सध्या मित्रपक्ष असलेल्या खासदारांच्या मतदारसंघातही भाजपने उमेदवारासाठी चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेसाठी भाजपने सर्व्हेक्षण केले असून, या सर्वेक्षणात राज्यातील वातावरण तूर्त तरी भाजपसाठी अनुकूल नाही, असे चित्र आहे. त्यामुळे भाजपने काळजीपूर्वक रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकांच्या प्रचाराची सूत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असतील. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या मतदारसंघात गुंतवणूक ठेवले जाणार नाही, असेही भाजपच्या वरिष्ठ सूत्राने स्पष्ट केले.
—————–