वाघजाई फाटा ते जळगाव रस्त्याचे काम रखडले; कामाचा दर्जाही खराब, सरपंचांसह ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू!
– ठेकेदार दराडे व बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडून सरपंचांच्या मनधरणीचे प्रयत्न
सिंदखेडराजा/देऊळगावराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील वाघजाई फाटा ते जळगाव या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे होत असून, शिवाय ते रखडलेदेखील आहे. त्यामुळे या भागात भयानक प्रसंगांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत गेल्या नऊ महिन्यांपासून वाघजाई गावाचे सरपंच गजानन सानप व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजाकडे विनंतीअर्ज, तक्रारी केल्यात. परंतु, देऊळगावराजाच्या कार्यकारी अभित्यांनी या अर्जांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे अखेर आजपासून सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले असून, हे आंदोलन चांगलेच पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज कार्यकारी अभियंता, पोलिस अधिकारी व ठेकेदाराने सरपंचांसह ग्रामस्थांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आधी काम सुरू करा, तरच उपोषण सोडतो, असे सरपंच सानप यांनी या अधिकार्यांना ठणकावून सांगितले.
वाघजाई फाटा ते जळगाव रस्त्याचे राहिलेले काम पूर्ण करा, या मागणीसाठी वाघजाई येथील सरपंच व गावकरी यांनी बांधकाम विभाग देऊळगावराजा यांना लेखी निवेदन देऊन, तोंडी तक्रार करूनही सबंधित ठेकेदार यांनी काम पूर्ण केले नाही. त्यामुळे गावाचे सरपंच गजानन सानप व ग्रामस्थ हे दिनांक २९ सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. हा रस्ता सिंदखेडराजा येथे दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असून, तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे. हा रस्ता डांबरीकरण मजबुतीकरण व पुलासह संबंधित विभागाने निविदा प्रक्रियेद्वारे दराडे या ठेकेदाराला दिलेला आहे. हा रस्ता वाघजाई गावाजवळ अत्यंत खराब असून, जाणे येणे कठीण झाले आहे, पाण्याची विल्हेवाट लावलेली नाही. त्यामुळे गटार निर्माण झाले असून, गावात रोगराईचे प्रमाण वाढले आहे व गावासमोरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या गंभीर बाबींची दखल घेऊन अपूर्ण काम पूर्ण करावे व निकृष्ट कामाची चौकशी करावी, असे न झाल्यास २९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचे सरपंच व ग्रामस्थांनी कळवले होते. तरीही ठेकेदार व गेंड्याची कातडी पांघरलेल्या बांधकाम विभागाने रस्त्याचे काम केले नाही. परिणामी, सरपंचासह ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले असून, परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. नजीकच्या काळात हे आंदोलन चांगलेच पेटण्याची शक्यता आहे.
भूमिअभिलेख अंतर्गत मोजमाप करून जे अतिक्रमणधारक आहे, त्यांचे अतिक्रमण काढून अपूर्ण काम लवकर पूर्ण करणार आहोत.
– बी. एस. काबरे, कार्यकारी अभियंता देऊळगावराजा
नऊ दिवस अगोदर कळवूनसुद्धा व उपोषणाचा इशारा देऊनदेखील ठेकेदार व सबंधित बांधकाम विभाग यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता भाले, ठेकेदार नाथाभाऊ दराडे, किनगाव राजाचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांनी उपोषणस्थळाला भेट दिली व सरपंच गजानन सानप आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, सरपंच व त्यांचे सहकारी यांनी काम सुरू करा, तेव्हा उपोषण सोडू, अशी भूमिका घेतली.
याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सरपंच सानप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सांगितले की, मी ९ महिन्यापासून या विभागाला लेखी निवेदन दिले, पण हे अधिकारी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत असून, खोट बोलतात व वेळ मारून नेतात. या रस्त्यामुळे बरेच अपघात दररोज घडतात, बर्याच जणांना अपंगत्व आले आहे, रोगराई पसरत आहे. याला जबाबदार संबंधित विभाग व ठेकेदार आहे. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे. या उपोषणास माजी सरपंच लिंबाजी सानप, अशोकराव सानप, रामकिसन सानप, दत्तू सानप, मंगेश कोटगिरे, राजू सानप, सुखदेव झोटे, संदीप बोरुडे, शिवहरी बोरुडे, शरद सानप, सचिन सानप, भगवान सानप, उमेश सानप, समाधान सानप, राधाकिसन सानप, पर्वता सानप, संतोष सानप यांनी सहभाग घेतला आहे.