किनगावजट्टू (जयजीत आडे) – लोणार तालुक्यातील वझर आघाव येथे कार्यरत असलेला तलाठी प्रकाश अर्जुन डोईफोडे (वय ५३) याने बिबी येथील एका महिलेच्या घरी जाऊन ‘तू माझा फोन का उचलत नाही’, असे म्हणून तिच्या हाताशी धरले व तिला कवटाळून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार २७ सप्टेंबररोजी भरदुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. या घटनेने घाबरलेल्या महिलेने बिबी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास या मस्तवाल तलाठ्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
तालुक्यातील वझर आघाव येथे कार्यरत असलेला तलाठी प्रकाश अर्जुन डोईफोडे (वय ५३) हल्ली मुक्काम बिबी याने पीडित महिला राहणार बिबी हिच्या घरी जाऊन सदर महिलेस ‘मी तुला फोन करतो तू माझा फोन उचलत का नाही व माझ्यासोबत बोलत का नाही’, असे म्हणून महिलेचा वाईट उद्देशाने डावा हात धरून तिला कवटाळले व तिचा विनयभंग केला. हा प्रकार महिलेच्या मुलाने पहिला असता सदर आरोपीस त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, संबंधित आरोपीने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली व त्यानंतर पीडित महिलेने लागलीच पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार बिबी पोलिस ठाणे येथे सांगितला. त्यानंतर बिबी पोलिसांनी रात्री १० वाजून ३२ मिनिटांनी सदर आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या ३५४, ४५२, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण व पोलिस कॉन्स्टेबल विनायक मोरे हे करत आहेत.