BULDHANAMEHAKARVidharbha

मनमानीचा कळस; शासकीय सुट्टी नसतानाही ‘पीएचसी’ला कुलूप!

– वैद्यकीय अधिकार्‍याच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार!
– तालुका वैद्यकीय अधिकारी ड़ॉ.रणजीत मंड़ाले ‘अ‍ॅक्शन मोड़’वर; १२ कर्मचार्‍यांची केली बिनपगारी, डॉक्टरांवरही कारवाई प्रास्तावित!

मेहकर/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आरोग्य सेवा तशी अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे सुट्टी हा विषय तसा दुय्यमच. परंतु, यातही आता मनमानीचा शिरकाव होवू लागला की काय? असे दिसत असून, त्याचा परिणाम मात्र थेट आरोग्य सेवेवर होत असल्याने याच्या त्रासाची झळ मात्र काहीच दोष नसलेल्या गोरगरीब रूग्णांना सोसावी लागत आहे. असाच काहीसा संताप व चीड़ आणणारा प्रकार २८ सप्टेंबररोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घड़ला. यादिवशी शासकीय सुट्टी नसतानाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला (पीएचसी) चक्क कुलूप होते, व बाह्यरूग्ण सेवादेखील बंद होती. याचा सरपंच संदीप अल्हाट यांच्यासह गावकर्‍यांनी गांधीमार्गाने रोष व्यक्त करत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी ड़ॉ. रणजीत मंड़ाले यांना कळताच त्यांनी तातड़ीने येथे भेट देत कर्मचार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले, व बारा जणांची बिनपगारीदेखील केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच, संबंधित ड़ॉक्टरांवरही कारवाई प्रास्तावित करणार असल्याची माहिती आहे.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा तसे दुर्गम व ड़ोंगराळ भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या पीएचसी अंतर्गत देऊळगाव साकरशासह मांड़वा फॉरेस्ट, पारखेड़, नायगाव देशमुख, वागदेव, वड़ाळी, मोहना, मांड़वा समेत ड़ोंगर, पाथर्ड़ी, बोथा, वरवंड़, घाटनांद्रा, उटी, घाटबोरी, नागेशवाड़ी, टेंभूरखेड़सह चोवीस गावे असून, वरवंड़, घाटबोरी, मांड़वा फॉरेस्ट व उटी ही चार उपकेंद्र आहेत. यातील बहुतांश गावे आदिवासी बहुल क्षेत्रातील आहेत. त्यामुळे बहुतांश गावात इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने येथील जनतेला याच पीएचसी व उपकेंद्रावर अवलंबून राहावे लागते. मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबररोजी शासकीय सुट्टी नसतानाही देऊळगाव साकरशा येथील पीएचसी कुलूपबंद होती, तसेच ओपीडीही बंद होती. यामुळे मात्र अनेक रूग्णांना उपचाराविनाच परत जावे लागले. ही गंभीर व संतापजनक बाब सरपंच संदीप अल्हाट व सदस्य रणजीत देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी ड़ॉ. अमोल गीते व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंड़ाले यांना सुटीबाबत विचारपूस केल्यावर उघड़कीस आली. याबाबतची माहिती होताच तालुका आरोग्य अधिकारी ड़ॉ. रणजीत मंड़ाले हे तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले व कर्मचार्‍यांची चांगलीच कानउघाड़णी केली. त्यांनी दहा ते बारा कर्मचार्‍यांची बिनपगारीदेखील केल्याची माहिती आहे. या संतापजनक प्रकाराचा सरपंच संदीप अल्हाट, ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य बबन चव्हाण, सदस्यपती रामचंद्र चव्हाणसह इतरांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत गांधी मार्गाने रोष व्यक्त केला.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी ड़ॉ. रणजीत मंड़ाले यांनी संबंधित ऑनड्युटी ड़ॉक्टरवर कारवाई प्रास्तावित करणार असल्याचे सांगितले. पर्यायी ड़ॉक्टर येईपर्यंत म्हणजे रात्री उशिरापर्यंत देऊळगावमाळीचे वैद्यकीय अधिकारी ड़ॉ. सुलतानेसह ते पीएचसीत ठाण मांड़ून होते. यावेळी माजी सरपंच सखाराम आमले, पोलीस पाटील गजानन पाचपोर, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक व ज्येष्ठ पत्रकार बाळू वानखेड़े, विश्वास सरदार, सागर पायघन, कृष्णा चव्हाण यांच्यासह या पीएचसीचे काही कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. काल, दि. २९ सप्टेंबररोजी ईदची शासकीय सुट्टी असतानाही येथील पीएचसीची ओपीडी (बाह्यरूग्ण सेवा) मात्र नियमित सुरू होती.


याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी ड़ॉ. अमोल गीते यांना विचारले असता, सदर दिवशी संबंधित पीएचसी बंद असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी ड़ॉ. रणजीत मंड़ाले यांनी कळविले असून, याबाबत संबंधितांना खुलासा मागवून योग्य कारवाई करणार असल्याचे त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!