चिखली तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी सतीश पाटील भुतेकर; कार्याध्यक्षपदी सौ. किरणताई गाडेकर
चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी इसरूळचे लोकनियुक्त व लोकप्रिय सरपंच सतीश पाटील भुतेकर यांची तर कार्याध्यक्षपदी तेल्हाराच्या सरपंचा सौ.किरणताई गाडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज (दि.24) रोहडा येथे पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात या निवडी करण्यात आल्यात. या निवडीबद्दल तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिखली तालुक्यातील रोहडा येथील रेणुकादेवी संस्थानच्या सभागृहात आज (दि.२४) सरपंच मेळावा पार पडला. या मेळाव्यात चिखली तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. चिखली तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते इसरूळचे लोकनियुक्त तथा लोकप्रिय सरपंच सतीश पाटील भुतेकर यांची तर कार्याध्यक्षपदी ‘आरआर आबा सुंदर गाव’ तेल्हाराच्या सरपंचा सौ. किरणताई गाडेकर यांची निवड करण्यात आली. या मेळाव्याला तालुक्यातील सर्वच सरपंचांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
सतीश पाटील भुतेकर हे चिखली तालुक्यातील लोकप्रिय सरपंच असून, इसरूळ गावाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजय संपादन केला होता. तालुकाभर त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. विकास मिसाळ, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, मिसाळवाडीचे उपसरपंच हनुमान मिसाळ, भाजपचे नेते विष्णू शेनफड घुबे, चिखली बाजार समितीचे संचालक कृष्णा पाटील मिसाळ, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे अध्यक्ष तथा मुख्य संपादक, उद्योजक पुरूषोत्तम सांगळे आदींसह परिसरातील सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.