चिखलीतील विषबाधाप्रकरणी वसतीगृहाची अधीक्षिका सस्पेंड!
– चिखली पोलिसांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल
बुलढाणा/चिखली (बाळू वानखेडे) – चिखली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे व आर्थिक मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील सहा मुलींना २२ सप्टेंबरच्या रात्री जेवणातून विषबाधा झाली होती. या मुलींना चक्क अळ्या असलेले अन्न खायाला दिल्याचेही धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर आल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाने या वसतिगृहाच्या अधीक्षिका स्मीता श्रीकांत जोशी यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, विविध दलित संघटनांनी याप्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात गौरी पूजनानिमित्त सर्वजण गोडधोड खात असताना मागासवर्गीय समाजाच्या मुलींना अळ्या पडलेले शिळे अन्न खायाला घालण्यात आलेले होते. शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी अधीक्षिका स्मीता जोशी यांनी ऐन सणासुदीत वसतिगृहातील मुलींना अळ्या व कीटकयुक्त अन्न खाऊ घातले. या प्रकारामुळे वसतिगृहातील सहा मुलींना विषबाधा झाली. परिणामी, रात्री २ वाजता येथील एका खासगी रुग्णालयात मुलींना दाखल करावे लागले. दरम्यान, याची गंभीर दखल घेत, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्याकडे तक्रार करून, वसतिगृह अधीक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करीत संताप व्यक्त केला होता. धक्कादायक बाब अशी, की हा प्रकार उघडकीस येऊ नये, यासाठी वसतिगृह प्रशासनाने मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल न करता, खासगी रुग्णालयात दाखल केले. सोबत रुग्णालयात दाखल मुलींना या प्रकाराबाबत बाहेर कुठेही वाच्यता कराल, तर तुमचे ‘करिअर’ बर्बाद करू, अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, सकाळी पत्रकार, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकार्यांनी रुग्णालय गाठल्यानंतर वसतिगृहातील हा प्रकार उघडकीस आला. विषबाधा झालेल्या सर्वच मुली बुलढाणा जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजातील व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आहेत. घटनेची माहिती मिळताच, माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी रुग्णालयात दाखल होत, मुलींची विचारपूस केली. वसतिगृहाच्या पाहणीत येथील मुलींचे हाल होत असल्याचे उघडकीस आले. प्रामुख्याने चार्टनुसार पोषक आहार दिला जात नाही. मुलींना दिल्या जाणार्या जेवणात व नाश्त्यात अळ्या, कीटक आढळतात, पोळ्या कच्च्या असतात, वसतिगृहात अस्वच्छता आहे. सोबतच मुलींना सॅनिटरी पॅड व इतर भौतिक सुविधांची वाणवा असल्याचे समोर आले.
दरम्यान, आ. श्वेताताई महाले यांनी याप्रकरणी संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यावरून समाजकल्याण विभागाने संबंधित वसतिगृह अधीक्षिकेला तातडीने निलंबित करण्याचे आदेश २५ सप्टेंबररोजी दिले आहेत. विषबाधेच्या या घटनेबाबत विशेष तपासणी पथकामार्फत २३ सप्टेंबररोजी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता, या शासकीय वसतिगृहाच्या ठिकाणी मुलींना देण्यात येणार््या भोजनाची प्रत अत्यंत निकृष्ट असल्याचे तसेच इतर सोई-सुविधांच्या बाबतीत गंभीर उणिवा आढळून आल्या, तसेच अधिनस्त कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचार्यांच्या व कर्मचार्यांच्या कामावर नियंत्रणाचा अभाव असल्याचे अहवालावरून निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल एस. एस. जोशी, कनिष्ठ लिपिक यांनी शासकीय कर्तव्य पार पाडताना हलगर्जीपणा व कसूर केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक नियम १९७९) नियम क्रमांक ३ (१) (एक) (दोन) (तिन) मधील नियमाचा भंग केलेला असल्याने त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ४ (१) (अ) या नियमांतर्गत कनिष्ठ लिपिक या पदाचे नियुक्ती प्राधिकारी व शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणून प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती यांनी कनिष्ठ लिपिक एस. एस. जोशी यांना शासकीय सेवेतून तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.
चिखली पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
मानवतेला काळिमा फासणार्या या घटनेप्रकरणी सीमा प्रकाश चव्हाण वय २३, रा. सावखेड नागरे, ता. देऊळगावराजा हिने चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आरोपी वसतिगृहाच्या अधीक्षक स्मीता श्रीकांत जोशी वसतिगृहातील मुलींच्या जेवणात अळ्या व उंदरांच्या लेंड्या निघाल्यावरून मुलींना विषबाधा होऊ शकते हे माहीत असूनही जाणीवपूर्वक अन्न खायला दिले, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून कोणाला काही सांगितल्यास प्रवेश रद्द करण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीवरून आरोपी जोशींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चिखली पोलिस करत आहेत.