– शेती खरडून गेल्याने सोयाबीन, कपाशी पिकांचे अतोनात नुकसान
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात मुसळधार पावसाने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी चालवली आहे. नांदुरा तालुक्यातील चित्र तर फारच भीषण आहे. या तालुक्यातील लोणवडी, खडदगाव, पिंपळखुटा धांडे व माळेगाव गोंड या चार गावांत शनिवारी रात्री ढगफुटीसदृश पावसामुळे शेतांचे तलाव झाले. नदी व नाल्याच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या, तर लोणवाडी व खडदगाव येथील जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील वडनेर परिसरात ८१.५ मिमी, तर महाळुंगे परिसरात ८० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये १२५ घरांची पडझड, तर ७६ जनावरे वाहून गेल्याची माहिती तहसीलदार दिगंबर मुकुंदे यांनी दिली. लोणवाडी गावातील नदीला आलेल्या पुरात काठावर बांधलेल्या ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तसेच तीन वगार पाण्यात वाहून गेल्या आहेत. नदीवर असलेला लघुसिंचन प्रकल्प अंदाजे ६० टक्के भरला आहे. त्यासोबत शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून, कपाशी पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. अनेक गावांमध्ये शेती ही खरडून गेल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यात घाटाखालील तालुके व घाटावरील तालुके अशा चोहीकडे या पावसाने हजेरी लावल्याने नुकसानीचा आकडा फार मोठा आहे. परंतु, प्रशासकीय यंत्रणा अद्यापही सुस्त दिसत असून, लोकप्रतिनिधीही अद्याप झोपेत असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीचे पीक शेतात बहरली असताना, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी रात्री नांदुरा तालुक्यातील सहा गावांमध्ये सतत तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस धो-धो कोसळला. सकाळपर्यंत परिसरातील सर्व शेती जलमय झाली. रविवारी दुपारपर्यंतही शेतामध्ये साचलेल्या पाण्यात पिके बुडाली होती. शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन कपाशी व तूर पिकांचे नुकसान झाले. खळदगाव परिसरातील शेतांमध्ये साचलेले पाणी विहिरींमध्ये उतरल्याने विहिरी काठोकाठ भरल्याचे दिसून आले. लोणवाडी नाल्याच्या पुराचे पाणी काठावरील गुरांच्या गोठ्यातून वाहिल्याने या गावातील म्हशी, गाई, बकरा व कोंबड्या वाहून गेल्या, तर खुंट्याला बांधले असल्याने काहींचा जागीच मृत्यू झाला. नाल्याचे पाणी घरात घुसल्याने लोणवाडी येथील घरांचेही नुकसान झाले. या पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार राजेश एकडे यांनी पाहणी करून, प्रशासनाला सूचना केल्या आहेत. ढगफुटीसदृश्य पावसामुळे लोणवाडी येथील शेतकर्यांच्या शेतांचे तलाव झाले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. नाल्याच्या पुरात जनावरे वाहून गेल्याने दुहेरी नुकसान शेतकर्यांचे झाले आहे. त्यामध्ये गायी, म्हशी, बैलांचा समावेश आहे. पशुपालक पंजाबराव सोळंके, भीमराव सोळंके, अवचित सोळंके, शत्रगुण सोळंके यांचे नुकसान झाले आहे, तसेच गोठ्यात असलेल्या तीन लहान वगारी पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्या अद्याप सापडलेल्या नाहीत.
बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात पावसाचा जोर मोठा आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून १०० टक्के नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे. नांदुरा तालुक्यात अनेक गावात पावसाचे पाणी शिरून अनेक घरे पडली, तर २० ते २५ जनावर पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यासोबत शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून, कपाशी पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. अनेक गावांमध्ये शेती ही खरडून गेल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घाटावरदेखील पावसाचा जोर चांगलाच असल्याने सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.
—————–