अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले; मंदिरात नेऊन बळजबरीने लग्नाची धमकी दिली!
खामगाव (भागवत राऊत) – महाविद्यालयीन शिक्षणासाठी एसटीने ये-जा करणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीला टेंभूर्णा येथील मंगेश एकनाथ वसतकार (वय २३ वर्ष) या टुकार मुलाने बळजबरीने त्याच्या दुचाकीवर बसवून पळवून नेले. तिला एका मंदिरात नेऊन माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे! तुझ्याशी लग्न करायचे आहे, म्हणून त्याने तिला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या या अल्पवयीन मुलीने जोरात रडायला सुरूवात केल्याने हा टुकार तरूण तिला तेथेच सोडून पळून गेला. या घटनेने खामगावात एकच खळबळ उडाली असून, शिक्षणासाठी येणार्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तातडीने असल्या टुकार तरूणांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सविस्तर असे, की एक सतरावर्षीय अल्पवयीन तरुणी खामगाव येथील एका कॉलेजला शिक्षण घेते. ती दररोज एसटी बसने खामगावला ये जा करत असते. २० सप्टेंबररोजी सकाळी ७.२५ वाजताच्या दरम्यान ही अल्पवयीन तरुणी कॉलेजला जात होती. ती बसस्थानक खामगाव येथे बसमधून खाली उतरली. याचवेळी मंगेश एकनाथ वसतकार (वय २३ वर्ष, रा. टेंभुर्णा) हा टुकार तरूण तिथे त्या तरुणीचा पाठलाग करत मोटारसायकल घेवून आला. त्या तरुणीला थांबवून म्हणला चल तुला कॉलेजला सोडतो, असे म्हणून मोटारसायकलवर बस म्हणू लागला. त्या तरुणीने मोटारसायकलवर बसण्यास नकार दिला.
यावेळी मंगेश याने तिला मारण्याची धमकी देवून जबरदस्ती तिला आपल्या मोटारसायकलवर बसवून घाटपुरी येथील नवनाथ मंदिर येथे घेऊन गेला. येथे पोहोचल्यावर त्याने त्या मुलीचे दोन्ही हात जबरदस्तीने आपल्या हातात पकडून तिला म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. असे म्हटल्यानंतर ती मुलगी खूप घाबरली होती. त्यामुळे तिथे मोठ्याने रडायला लागली, यावेळी मंगेश हा तिथून त्याच्या मोटरसायकलने पळूनन निघून गेला. यानंतर ती मुलगी आपल्या कॉलेजमध्ये निघून गेली. कॉलेज संपल्यानंतर तिने हा घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. शेवटी आज, २३ सप्टेंबर रोजी मंगेश या टुकाराविरुद्ध अल्पवयीन मुलीने तशी तक्रार खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज बांडे हे करीत आहेत. खामगावातील अशा टुकारांचा त्वरित शोध घेऊन त्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी मुलींच्या पालकांतून होत आहे. अन्यथा, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.