Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

बुलढाणेकरांचे रविकांत तुपकरांना ‘नोट भी, वोट भी’!

– लोकसभा निवडणुकीसाठी गावागावातून निधी अन् मते दोन्ही मिळणार!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्‍यांची मुलूख मैदानी तोफ म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या प्रकृतीच्या करणाने घरी आराम करत आहेत. अशातच देऊळगाव मही येथील शेतकर्‍याने त्यांना एक धक्का दिला. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा आवाज दिल्लीत संसदेत पोहोचावा, यासाठी आता तुम्ही लोकसभा लढाच असा आग्रह धरत निवडणुकीसाठी एक लाख रुपयांचा निधी देण्याचा निश्चय व्यक्त करत, त्यातील अ‍ॅडव्हास म्हणून २५ हजारांचा धनादेश रविकांत तुपकर यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, यावेळेस तुपकर यांना संसदेत पाठविण्याचा निर्धार जिल्हावासीयांनी व्यक्त केला असून, तुपकरांची खराब आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याविरोधात धनाढ्य व ‘४० खोकेवाले’ उभे राहणार असल्याने पैशाचा महापूर वाहण्याची शक्यता पाहाता, तुपकरांना लोकसभा निवडणुकीसाठी ‘नोट आणि वोट’ दोन्हीही देण्याचे जिल्ह्यातील शेतकरीवर्गाने निर्धारित केले आहे. त्यादृष्टीने गावोगावातून किमान ‘एक रूपया आणि एक मत’ तुपकरांच्या झोळीत टाकण्यासाठी जोरदार वातावरण निर्मिती होत आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या आजारी असून, त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ते सध्या घरीच आराम करत आहेत. यादरम्यान जिल्हाभरातील कार्यकर्ते, शेतकरी त्यांची भेट घेण्यासाठी दररोज येत आहेत. देऊळगाव मही येथील पुरुषोत्तम नारायण शिंगणे हे सर्वसामान्य शेतकरीदेखील देऊळगाव मही येथील कार्यकर्त्यांसोबतच रविकांत तुपकरांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी घरी आले होते. अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करतांना शेतकरी पुरुषोत्तम शिंगणे यांनी आता काहीही झाले तरी यावेळी लोकसभेची निवडणूक लढवाच, असा आग्रह रविकांत तुपकरांकडे धरला. लोकसभेची निवडणूक लढवून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे दिल्लीत प्रतिनिधित्व करावे, नेतृत्व करावे, अशी भावना सर्वसामान्य शेतकर्‍यांची आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक लढविण्यासाठी खर्च लागतो हे आम्हाला माहीत आहे, हे त्यांनी बोलून दाखविले. नुसते बोलूनच न थांबता निवडणुकीसाठी १ लाख रुपयांचा मदत निधी देण्याचा निश्चय त्यांनी सांगितला आणि एवढ्यावरच न थांबता त्यातील अ‍ॅडव्हान्स २५ हजारांचा धनादेश रविकांत तुपकरांकडे सुपूर्द केला. माझ्यासारखे असंख्य शेतकरी स्वत: निवडणूक निधी उभा करण्यासाठी सज्ज आहेत, भाऊ तुम्ही फक्त लोकसभा लढा, असा आग्रहच त्यांनी यावेळी धरला. त्यांचा हा आग्रह आणि ही आपुलकीची माया पाहून रविकांत तुपकरांसह त्यांचे कुटुंबीय गहिवरुन गेले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. यावेळी उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनाही या प्रसंगाने भावनिक केले होते.
एका वर्षांपूर्वी मित्रमंडळी, सहकारी व शेतकरी बांधवांनी रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून इंव्होवा क्रिस्टा गाडी भेट दिली होती, अजूनही त्या गाडीच्या डिझेलचा फंड मित्रपरिवार व शेतकरी बांधव मोठ्या आत्मियतेने चालवत आहे. त्यात आता रविकांत तुपकरांनी लोकसभा लढवावी, असा आग्रह धरत लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुरुषोत्तम शिंगणे यांच्यासारखे सर्वसामान्य शेतकरी निधीदेखील जमा करत असल्याचे दिसून येत आहे. २० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा कमावलेला हा गोतावळाच रविकांत तुपकरांची खरी संपत्ती असल्याचे यातून दिसून आले, हे विशेष.


शेतकरी बांधवांनी नेहमीच मला घरातील सदस्याप्रमाणे प्रेम आणि सन्मान दिला आहे. मी आपले नेतृत्व करावे, अशी शेतकर्‍यांची तीव्र भावना आहे. म्हणूनच पदरमोड करून ते मला निवडणूक लढवता यावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे मला अधिक जबाबदारीची जाणीव होत आहे. हा केवळ निधी नसून आशीर्वाद आहे, पाठबळ आहे आणि अद्वितीय अशी प्रेरणा आहे, असे भावोद्गार यावेळी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!