Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

शाह मुंबईत; पवार गुजरातमध्ये!

– शरद पवारांनी घेतली उद्योगपती गौतम अदानींची भेट; अहमदाबादमध्ये अर्धातास बंददाराआड खलबते!

नवी मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्याच्या राजकारणात लवकरच राजकीय भूकंप घडण्याचे संकेत प्राप्त होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये भेट घेऊन खलबते केली. यावेळी पवार हे अदानी यांच्या कौटुंबीक कार्यक्रमालाही हजर राहिले. पवार-अदानी जेव्हा भेट होते, तेव्हा राजकीय घडामोडी घडत आल्या आहेत. त्यामुळे या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले व शिंदेंना घेऊन ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. तेथे या तिघांत बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे हजर नव्हते, हे मात्र विशेष. तसेच, शाह यांच्यासोबतच्या कार्यक्रमांना पवार यांनी जाण्याचे टाळल्याचेही प्राकर्षाने दिसून आले आहे.

एकीकडे अमित शाह हे मुंबईत राजकीय खलबते करत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे समन्वयक शरद पवार हे मात्र अहमदाबादमध्ये उद्योगपती गौतम अदानीच्या भेटीला गेले होते. या दोघांत अर्धातास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्राने दिली. पुण्यातील एका उद्योगपतीच्या फॅक्टरीचे उद्घाटनही पवार व अदानी यांनी केले. या भेटीबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली असेल, त्यात वेगळे काय आहे. शरद पवार हे गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची भेट घेतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल? याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा होत असते. त्यावर पॉलिसी करत असतात. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी करता येत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या मनात काय आहे? हे कुणी सांगू शकत नाही. ते अंतरयामी आहेत. त्यामुळे मनात, पोटात आणि ओठात काय हे शरद पवार यांनाच माहिती असते. शरद पवार हे गौतम अदानींचे मित्र आहेत. गौतम अदानी हे शरद पवारांची वारंवार भेट घेत असतात. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात सध्या आमदार अपात्रतेचा मुद्दा गाजत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असल्याचं बोललं जातंय. या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामध्ये जळगावमधून उज्ज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर, मुंबईतल्या एका मतदारसंघासाठी माधुरी दीक्षित तर पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सूत्राच्या माहितीनुसार, गुजरातमधील अहमदाबाद येथे गौतम अदानी यांच्या निवासस्थानी शरद पवार गेले होते. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगितले जाते. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. पवार आणि गौतम अदानी यांची यापूर्वीही दोनदा भेट झाली होती. हिंडनबर्गच्या अहवालानंतर २० एप्रिल २०२३ ला गौतम अदानी यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, दुसरी भेट २ जून २०२३ मध्ये झाली होती. शरद पवार आणि गौतम अदानी यांची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी भेट असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!