वर्धा (प्रकाश कथले) – बैलपोळ्याचा सण असल्याने बैलजोडीची सजावट करण्यापूर्वी बैलजोडी धुण्याकरीता तलावाच्या पाण्यात गेलेल्या शेतकरी पिता, पुत्राचा तलावातील पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज ता.१४ रोजी हिवरा हाडके येथे घडली. अख्खे गाव पोळ्याचा सण साजरा करण्याच्या उत्साहात असताना हे धक्कादायक वृत्त आल्याने गावावरच शोककळा पसरली आहे.
तलावातील पाण्यात बुडाल्याने मरण पावलेल्या पित्याचे नाव राजू पुंडलिक राऊत (वय ५३) तसेच त्यांच्या मुलाचे नाव चंद्रकांत राजू राऊत (वय २७) आहे. हिवरा हाडके येथे गावाशेजारीच तलाव आहे. पोळ्याचा सण असल्याने दोघेही बैलजोडी घेऊन बैलांना स्नान करविण्यास तलावाच्या पाण्यात गेले होते. बैलजोडी धूत असताना बैल सरळ पाण्यात जायला लागले. त्यातील बैलाला तलावाच्या किनार्यावर आणताना राजू राऊत पाण्यात खोलवर ओढल्या गेले. वडील बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्याकरीता मुलगा चंद्रकांत राऊत धावला. त्याचाही बुडाल्याने मृत्यू झाला. दोघांनाही तलावातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पुलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तलावातील पाण्यात शोध घेतला असता मुलगा चंद्रकांत याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. राजू हाऊत यांचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.