– अंत्रज फाट्याजवळील अपघातातील चौघा गंभीर जखमींना अकोल्याला हलविले!
चिखली/लोणार (तालुका प्रतिनिधी) – बैलपोळा सण सर्वत्र उत्साहात व शांततेत साजरा झाला असला तरी, चिखली-खामगाव मार्गावरील अंत्रज फाट्याजवळील सिंदी नाक्याजवळ झालेल्या अपघातात एका शेतकर्याचा मृत्यू झाला, तर चौघे शेतकरी गंभीर जखमी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, नदीच्या डोहात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सुलतानपूर शिवारात उघडकीस आली आहे. या दुर्देवी घटनेने पोळा सणाला सुलतानपूर गावावर शोककळा पसरली होती.
ऐन पोळ्याच्या दिवशी झालेल्या वाहन अपघातात एका शेतकर्याचा मृत्यू झाला, तर इतर चौघांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. गुरुवारी ( दि.१४) चिखली – खामगाव मार्गावरील अंत्रज फाट्याजवळील सिंदी नाक्याजवळ ही दुर्घटना घडली. अंत्रज गावातील चौघे शेतकरी शिवाजी भारसाकळे यांच्या ऑटोमध्ये भाजीपाला विक्रीसाठी खामगावला जात होते. दरम्यान, फाट्याजवळ मागून भरधाव येणार्या अज्ञात वाहनाने ऑटोला धडक दिली. यात अनिल बगाडे (वय ३४) यांचा मृत्यू झाला. तसेच निलेश बगाडे (वय ३५), पुरुषोत्तम बगाडे (वय ३२), मोहन वानखडे (वय ५०) व भार साकळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे भरती करण्यात आले.
दुसरीकडे, नदीच्या डोहात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सुलतानपूर शिवारात १४ सप्टेंबरला उघडकीस आली. या घटनेमुळे पोळा सणाला सुलतानपूर गावावर शोककळा पसरली होती. आदित्य कैलास अवचार (वय १४) हा १३ सप्टेंबर रोजी घरी न आल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी गावालगतच्या सीता न्हानी नदीच्या एका डोहाजवळ त्याचे कपडे दिसून आले. येथील शे. तबारक, साहेबराव शिंदे व कैलास ढवळे या युवकांनी डोहात उतरून शोध घेतला असता आदित्यचा मृतदेह सापडला. दरम्यान, मृतकाचा चुलत काका परमेश्वर आनंदा अवचार यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी मेहकर पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट जमादार लक्ष्मण कटक व त्यांचे सहकारी करीत आहेत.
————