Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

खा. सुप्रिया सुळे महाराष्ट्र दौर्‍यावर; अजितदादांबाबत बोलताना मात्र सावध भूमिका!

– अभिजीत पाटलांना बांधली राखी, पंढरपूरची जबाबदारी सोपविणार!

सोलापूर/पंढरपूर (हेमंत चौधरी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्हा दौर्‍यात पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले व राज्यातील सरकारवर टिकेची झोड उठविली. परंतु, त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांवर टीका करण्याचे टाळल्याने हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाय, अजितदादांच्या गटात न जाता, शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे राहणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना राखी बांधून पंढरपूर, सोलापूरची जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले आहेत. खा. सुळेंच्या या दौर्‍याने सोलापूर, पंढरपूर भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.

पंढरपूर येथे विठ्ठल-रूख्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, की महागाईने जनता त्रस्त आहे. धोरणाअभावी शेतीमालास भाव नाही म्हणून शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत. आरक्षणासाठी मराठा, धनगर समाज रस्त्यावर आहेत, राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. दुष्काळाचे संकट समोर उभा असताना राज्य आणि केंद्र सरकार नेमके काय करीत आहे? असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी विचारला होता. एकीकडे, त्या शिंदे-फडणवीस व केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत असताना, दुसरीकडे मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बोलण्याचे टाळले. तसेच, राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडीत सत्तेकडे न झुकता केवळ शरद पवार यांच्यावर मनापासून निष्ठा ठेवलेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचीही त्यांनी भेट घेऊन या लहान भावाला आपुलकीने राखी बांधली व त्यांचे औक्षण केले. खा. सुळेंच्या या भेटीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाची महत्वाची जबाबदारी चेअरमन अभिजित पाटील यांच्यावर येणार असल्याचे संकेत प्राप्त होत असून, पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे.
खा. सुप्रिया सुळे या सोमवारी पंढरपूर दौर्‍यावर असताना, त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे दोन तास खा. सुळे यांनी विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्याशी मुक्त संवाद साधताना त्यांच्याशी हितगुज केले. त्यानंतर श्रीविठ्ठल – रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर श्री विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही आमची संघटना मजबूत करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षचिन्ह आणि नाव या संदर्भात काय निर्णय देतो याची काळजी नाही. आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पक्षाने दिलेली आहेत. जे बाजूला गेले त्यांची भूमिका वेगळी असेल, असेही खा. सुळे यावेळी म्हणाल्यात.


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार काका-पुतण्यामध्ये आपापल्या गटाची ताकद वाढवण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे. अजित पवारांनी वेगळा गट निर्माण केल्यानंतर शरद पवार गटांची ताकद थोडी कमी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी राज्यभर विद्यार्थी संवाद यात्रा सुरू केली आहे. यादरम्यान त्या मोठ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या संवादयात्रेचा त्यांना येणार्‍या लोकसभा व विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कितपत फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजकीय टीका करताना त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोलणे टाळत असून, दादांना त्यांचा इतका सॉफ्ट कॉर्नर का, असाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!