पोलिस, ‘महसूल’च्या नाकावर टिच्चून अंढेरा-मेरा बुद्रूकमार्गे रेतीची चोरटी वाहतूक सुरू!
– दोन वर्षांपूर्वी झालेला अंढेरा, मेरा बुद्रूक डांबरीकरणाचा रोड जडवाहतुकीने उखडला!
चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा खुर्द मंडळ अंतर्गत येणार्या मेरा बुद्रूक या गावातून रेतीची सर्रास चोरटी वाहतूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या कॅमेरात काय कैद झाले आहे. अंढेरा-मेरा बुद्रूकमार्गे रेतीची अवैध टिप्परद्वारे वाहतूक दिवसा व रात्रीला राजरोसपणे चालू असल्याने महसूल व पोलिस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असताना दिसत आहे. राज्य सरकारने रेती वाहतूक बंद केलेली असताना महसूल व पोलिसांचे कोणते अधिकारी या रेतीमाफियांना अभय देत आहे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात येत असलेल्या पूर्णा नदीतून शासनाने वाळू उपसा करण्यास बंदी घातली असतानासुद्धा दिवस-रात्र रेती भरून अवैध टिप्पर वाहतूक करताना दिसत आहेत. महसूल विभागातील अधिकार्यांसोबत या रेतीमाफियांची हातमिळवणी असल्याचा दाट संशय असून, हप्तेखोरी जोरात सुरू असल्याचा संशय येत आहे. दोन वर्षांपूर्वी अंढेरा ते मेरा बुद्रुक डांबरीकरण झाले होते ते जड वाहतुकीने उखडल्यामुळे अनेक वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असला तरी, या मार्गे अवैध रेतीचे टिप्पर सर्रास चालू असल्याने महसूल विभागाच्या अधिकार्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभाग येणार्या काळामध्ये काय कारवाई करते, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे. तसेच, रेतीतस्करांना अभय देऊन महसूल व पोलिस विभागाचे कोणते अधिकारी मलिदा लाटत आहे, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
भुतेकरांमुळे रेतीमाफियांनी इसरूळ सोडून मेरामार्गे वळविले टिप्पर!
अंढेरा, मेरा बुद्रुकमार्गे होत असलेल्या अवैध रेतीचे टिप्पर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या कॅमेरात कैद झाले आहेत. एकीकडे इसरूळचे माजी सरपंच संतोष भुतेकर यांचा अवैध रेतीचे टिप्पर थांबून त्या टिप्पर चालकाला चहा व नाश्ता देण्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याचे एक-दोन दिवसात घडल्याचे सर्वांना माहितच आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन अनेक अवैध रेतीच्या टिप्परवर कारवाई केल्याचे आढळून आले आहे, असे होत असताना अवैध रेती वाहतूक करणार्या तस्करांनी इसरुळमार्गे न जाता आता अंढेरा, मेरा बुद्रुक या मार्गे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे.