कोंडी फुटली; मनोज जरांगे-पाटलांनी उपोषण सोडले!
– विखे, महाजन, दानवेंसह ज्येष्ठ नेते हजर; पवार-फडणवीस आले नाहीत!
– मराठा आरक्षणासाठी सरकारला महिनाभराचा वेळ देत जरांगे-पाटलांनी उपोषण मागे घेतले, साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – ‘एकनाथ शिंदे साहेबच मराठा आरक्षणाला न्याय देऊ शकतात. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आणि शिंदे साहेबांना हटू देणार नाही,’ असा निर्धार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, राज्य सरकारला महिनाभराची मुदत देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते फळांचा ज्युस घेऊन त्यांनी आज (दि.१४) सतराव्या दिवशी आपले उपोषण सोडले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंत्री अंतरवली सराटीत आले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार मात्र हे मात्र उपोषणस्थळी आले नाहीत.
आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषणदेखील मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्याहस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व मंत्र्यांसह यावे, अशी अट त्यांनी घातली होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली सराटी गावात ११ वाजेच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी जरांगे पाटलांसोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर जरांगे-पाटलांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. विशेष म्हणजे, आमरण उपोषण मागे घेतले असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटलांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कोंडी अखेर १७व्या दिवशी फुटल्याने राज्य सरकारने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
इतर समाजाच्या आरक्षणाचा अधिकार न डावलता, मराठा समाजाचा जो अधिकार आहे, तो आपल्याला मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. दुसऱ्या अन्य कुठल्याही जातीचे आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला देणार नाही. तसी आमची बिलकुल भूमिका नाही. अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. हे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, राजेश टोपे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली. मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उपोषणस्थळी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेंच न्याय देऊ शकतात, ही माझी भावना आहे. ते आज इथे आलेत म्हणून मी ही गोष्ट म्हणत नाही. पण ते आरक्षण देतील, हा माझा विश्वास आहे. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्यांचा वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्यांचा वेळ दिला आहे. ३१ व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देईल, असा विश्वास आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यावर जरांगे पाटील यांचे वडिलही मंचावर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ख्यालीखुशाली विचारली. मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस दिल्यावर मुख्यमंत्र्यानी जरांगे पाटलांच्या वडिलांनाही ज्यूस दिला.
समाजाशी गद्दारी करणार नाही – जरांगे पाटील
मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी केल्याशिवाय मी माघार घेणार नाही. माझा बाप अजूनही कष्ट करतो, मी त्याच्या कष्टाची जाणीव ठेऊन मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप मी कधीच सहन करणार नाही, असे सांगताना मराठा समाजबांधवांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही याप्रसंगी जरांगे पाटलांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह इतर निर्णय धाडसाने घेतले आहेत. शिंदेसाहेब न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केले. आपण जनआक्रोश आंदोलन असे नाव या आंदोलनाला दिले. आरक्षण तुमच्या आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. राज्यातील मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांची आशा आहे. मी भारावून न जाता, आरक्षण प्रश्नासाठी शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. इथून पुढच्या काळात आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या पोरांचा घास काढू नका, सरकारला आणखी १० दिवस वाढवून देतो. जीव गेला तरी तुमच्या पोरांच्या पदरात आरक्षण टाकेल. शिंदे साहेब येणार म्हटले, आणि मीही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही, शिंदे साहेबांना हटू देणार नाही, असा निर्धार याप्रसंगी जरांगे-पाटलांनी बोलताना व्यक्त केला.
————–