बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात लम्पी आजाराने पुन्हा ड़ोके वर काढले असून, या जिवघेण्या आजारापासून जनावरांना वाचविण्यासाठी आज, १४ सप्टेंबरचा बैलपोळा घरगुती पध्दतीने साजरा करा, असे आदेश नवनियुक्त जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यातील संसर्गजन्य केंद्र नियंत्रीत क्षेत्रासाठी घोषित करून लम्पी चर्मरोगाचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी गोवंशीय पशुधनाचा बाजार भरवू नये, प्राण्यांच्या शर्यती लावू नये, प्राण्यांची जत्रा भरवू नये व प्रदर्शनदेखील आयोजित करू नये. आज १४ सप्टेंबररोजी असणारा बैलपोळा सण घरगुती पध्दतीने साजरा करावा, यादिवशी जनावरे एकत्रित आणू नये. संबंधित यंत्रणांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरून जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रसार होणार नाही, असे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.