डरकाळी फोडून सांग जगाला; एकटा नव्हे तर ‘लाख मराठा’!
– मराठा पेटत नाही अन् पेटला तर विझणार नाही : पल्लवी जरांगेचा खणखणीत इशारा
बुलढाणा (गणेश निकम) – आम्ही शांत आहोत. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. पण हक्काचे घ्यायला कमी करणार नाही. बाप आमचा वाघ होता. आई आमची वाघीण होती आणि जिच्यामुळे मी इथे उभी आहे, त्या जिजाऊस मानाचा मुजरा, अशी सुरवात करीत आमच्या समाजाने काय पाप केलं की तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही. पण लक्षात घ्या मराठा शांत आहे म्हणून ठीक आहे. मराठा पेटत नाही पण पेटला तर विझणार नाही, असा खणखणीत इशारा देत, मराठा आरक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी जरांगे पाटील हिने मोर्चात प्राण ओतला. तेव्हा प्रचंड घोषणा अन् टाळ्यांचा कडकडाट होत होता. आजच्या मराठा क्रांती मोर्चात जरांगे पाटील यांचे कुटुंबीयांनी हजेरी लावल्याने मोर्चात आगळा वेगळा उत्साह संचारला होता. मराठा आरक्षण आणि जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात मराठ्यांची वज्रमूठ दिसली.
मराठा मोर्चासाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून समाज एकवटला होता. जिजामाता प्रेक्षागार येथे दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक येथे शिवपूजन पार पडले. त्यानंतर ‘एक मराठा लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणा देत मोर्चा शहराच्या मुख्यमार्गावरुन संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन, कोर्ट चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी निवडक जिजाऊ कन्यांनी मोर्चाचे नेतृत्व करीत जिजाऊकन्या वैष्णवी कड, गायत्री खराटे, समीक्षा चांडे, दीपाली भोसले, व पल्लवी जरांगे पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व करीत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. मोर्चाची सांगता ढगे हिच्यासह नेतृत्व करणार्या कन्यांनी जिजाऊ वंदनाने केली.
काय म्हणाली पल्लवी जरांगे पाटील…
– आम्ही हक्क मागतोय, आम्ही गुन्हा काय केला.
– आमचा बाप चार लेकरांचा पण सर्व समाजाचा तो आज बाप आहे. मराठा समाजाच्या लेकरांसाठी उपोषण करतोय.
– लाठीचार्ज करता, तुम्हाला उपोषण उठवायचे होते. अरे आम्ही हक्क मागतोय तुम्ही लाठ्या चालविता.
– आरक्षण तर द्यावेच लागेल, आम्ही शेतकर्यांची पोरं आहोत, आम्ही कुणबी मराठा आहोत.
तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!
मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी जिजामाता प्रेक्षागार येथे मोर्चेकरी जमले असता, तेथील गॅलरीतून उडी मारुन एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काहीवेळ खळबळ उडाली होती. मात्र तेथे उपस्थित पोलिस कर्मचारी व इतर मोर्चेकर्यांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. संभाजी भाकरे पाटील (नांदुरा), असे त्या तरुणाचे नाव आहे.
‘जनरल डायर’चे फलक झळकले!
जालना जिल्ह्यात लाठीहल्ला करण्यात आला. स्वातंत्र्याच्या आंदोलनात जालीयनवाला बाग येथे आंदोलन करणार्या आंदोलकांवर जनरल डायर या इंग्रज अधिकार्याने अमानुष गोळीबार केला होता. त्याची तुलना करीत आंदोलकांनी जालना येथे ‘जालीयानवाला बाग’ करु पाहणारा जनरल डायर कोण? असे फलक मोर्चात झळकले. मोर्चाच्या मध्यस्थानी हे फलक झळकल्याने पोलिस व शासनावरील तरुणांचा रोषही दिसून आला.
समाज रस्त्यावर नेते मात्र अनुपस्थित!
मराठा समाजाचा एल्गार सुरु असतांना आज समाज रस्त्यावर तर नेते घरी असेच चित्र दिसून आले. मराठा समाज संविधानीक मार्गाने लढा देत असतांना नेते पाठीशी उभे राहण्यात कमी पडतायत की काय? असेच चित्र आजच्या मोर्चात दिसले. आ. संजय गायकवाड, आ. राजेश एकडे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, जयश्री शेळक यांचा अपवाद वगळता मराठ्यांचे शेकड्याने असणारे नेते मात्र अपवादाने मोर्चाकडे फिरकले नाही. निवडणुकांच्या वेळी समाजाची आठवण काढणारे आज समाजाच्या प्रश्नावर आज अंतर राखून असल्याचे दिसून आले, हे विशेष.
वन मिशन मोर्चातही ‘वन’!
मराठा समन्वयकांनी मोर्चासाठी पराकाष्टा केली. सर्वच समन्वयक ताकदीने उतरले होते. त्यामुळे कोण कमी कोण अधिक असा भेद करता येत नसला तरी आदिती अर्बन परिवाराने झोकून देऊन कार्य केल्याचे दिसून आहे. बुलढाणा वन मिशनच्या माध्यमातून कार्य करणारे आजच्या कार्यातही ‘वन’ नंबरवर दिसले. या दोन शिलेदारांच्या जोडीला समन्वयकांनी कस लावल्याने मोर्चा दणक्यात पार पडला.