बुलढाण्यात भगवे वादळ धडकले, लाखोंचा मोर्चा, गगनभेदी घोषणा!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण द्यावे, तसेच जालना जिल्ह्यातील मराठा समाजावरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध, यासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज बुलढाण्यात अतिविराट मराठा क्रांती मोर्चा काढला. या मोर्चात लाखोंच्या संख्येने समाजबांधव, महिला, युवती, अबालवृद्ध सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी मोर्चेकरांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. जिकडे पहावे तिकडे नुसते भगवा महासागर दिसून येत होता. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाजाच्यावतीने पाच तरुणींनी आपले निवेदन दिले.
मराठा मोर्चात गगनभेदी घोषणा देण्यात आल्यात. ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजेत, अंतरवली घटनेचा तीव्र निषेध, जय जिजाऊ, जय शिवराय’, या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. अंतरवली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटलांची लेकदेखील या मोर्चात सहभागी झाली होती. दरम्यान, जिजामाता प्रेक्षागार येथून मोर्चाला सुरूवात होत असताना, एका मोर्चेकरी समाज बांधवाने प्रेक्षागार मैदानाच्या छतावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, स्वयंसेवकांनी तातडीने त्यांना रोखले. नांदुरा येथील संभाजी पाटील भाकरे असे त्यांचे नाव आहे. वेळीच अनर्थ टळल्याने मोर्चाला गालबोट लागण्याची घटना टळल्याबद्दल सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीचं बुलढाणा मराठा क्रांती मोर्चात तडाखेबाज भाषण…
मनोज जरांगेची मुलगी पल्लवी हिने जोरदार भाषण केलं. “आज 16 दिवस झाले आमचा बाप तिथे उपाशी आहे. पोटात अन्न आणि पाणीही नाही. केवळ समाजासाठी तो उपाशी आहे,” असं म्हणत पल्लवीने आंदोलनांवर लाठी चार्ज का केला? असा सवाल सरकारला विचारला आहे. “बाप आमचा वाघ होता, वाघीण आमची आई होती. आज जिच्यामुळे मी इथं उभी आहे ती आमची आई जिजाऊ होती,” असं म्हणत पल्लवीने आपल्या भाषणाला सुरुवात केली. “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंना त्रिवार वंदन करुन माझ्या भाषणाला सुरुवात करते. तुम्हाला सर्वांना माझा मानाचा जय शिवराय. अरे, हा मराठा समाज स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. का तर आरक्षण नाही. अरे आम्ही काय पाप केलं आहे की तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही?” असा प्रश्न पल्लवीने विचारला आहे.
दुसरीकडे, सकल मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरासह परिसरातील शाळा व महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांसह खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. शहरातील जवळपास २० शाळा आज बंद होत्या.