मेहकर (रवींद्र सुरूशे) – आगामी पोळा, गणेश उत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव माळी येथील पांडुरंग संस्थानच्या मंगल कार्यालय येथे जातीय सलोखा व शांतता व सुव्यवस्था याविषयी मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी गावकर्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. आपले सण उत्सव हे आनंदात आणि उत्साहात साजरे करा. त्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. तसेच मान-पानच्या भानगडीत न पडता गुण्यागोविंदाने सण उत्सव साजरे करा. तसेच तरुणवर्गांनी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता, पारंपारिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी केले.
यावेळी पोळा या सणानिमित्त गावकर्यांच्यावतीने अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी दक्षता म्हणून काही नियमावली ठरवण्यात आली. यामध्ये शेतकर्यांनी पोळ्यामध्ये बैल लावत असताना ज्याचा बैल अगोदर येईल तो समोर लावेल. तसेच गावांमधून बैल आणत असताना आपला बैल हा बसस्टॅन्ड मेन रोडने बैलांसमोर किंवा पोळा भरतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फटाके किंवा फुगे फोडू नये. अशा प्रकारची नियमावली ठरवण्यात आली. या जातीय सलोखा व सुव्यवस्था सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक विष्णू खरात हे होते. त्याचप्रमाणे मंचावर जेष्ठ मंडळी व मेहकर पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी गावातील समस्त ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र, गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते, तान्हा पोळा उत्सव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक कैलास राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश मगर यांनी केले.
कोणताही सण साजरा करत असताना जातीय सलोखा कायम ठेवून, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देता व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्या.
– राजेश शिंगटे, ठाणेदार मेहकर पोलीस स्टेशन