Head linesMEHAKARVidharbha

हिवरा आश्रम येथे भरधाव कारने दोघांना चिरडले; एकाचा मृत्यू, तर एक गंभीर!

हिवरा आश्रम (प्रतिनिधी) –  येथील हिवरा आश्रम – चिखली कडून मेहकर कडे जाणाऱ्या भरधाव कारने दोघांना चिरडल्याची घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास हिवरा आश्रम बस स्थानकावर घडली असून, यातील एकाचा सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जण जखमी असून मेहकर येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  विशेष म्हणजे, सहा महिन्यातील हा दुसरा अपघात असून, यापूर्वी टेम्पाे अंगावरून गेल्याचा एकाचा मृत्यू झाला होता. हिवरा आश्रम येथील बेशिस्त पार्किंग व गतिराेधक बसविण्याचा मुद्दा आता गंभीर बनला आहे.

हिवरा आश्रम येथील रहिवाशी नसीर शहा वजीर शहा वय ५५ हे बसथांब्यावर दूचाकीने येत असताना चिखलीकडून येणाऱ्या भरधाव कार क्र.एम. ए. ३० ए.ए. २१६६ ने नसीर शहा यांना जबर धडक दिली. सोबतच घरी पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी येथील राज अरुण मगरे वय १९ हा बसथांब्यावर आपल्या दूचाकीने येत असताना त्यालाही जबर धडक दिली. त्यानंतर सदर कार ही विरुध्द दिशेने येवून नालीला धडकली. यामध्ये दोन्ही दुचाकीसह कार चे नुकसान झाले आहे.  यातील जखमींना उपचाराकरिता मेहकर येथे दाखल केले असता जखमींपैकी नसीर शहा यांना उपचाराकरिता छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. तर राज मगरे यांचेवर मेहकर येथे उपचार सुरु आहेत. राज हा विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

गतिरोधकांची नागरीकांडून मागणी

10 फेब्रुवारी 2023 ला हिवरा आश्रम येथील युवकांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तेव्हा या घटनेची पुनरावृत्ती होवू नये म्हणून बस्थानकावर गतीरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र गतीरोधक बसविण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.


रस्त्‍याच्या दुतर्फा बेशिस्त पार्किंग..

हिवरा आश्रम येथे रस्त्‍याच्या दोन्ही बाजूने नागरीकांना चालण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला आहे. मात्र या रस्त्‍यावर किरकोळ व्यापारी यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. यामुळे वाहनधारक,पायदळ चालणारे ग्रामस्थ,महिला,वृध्द,शालेय विद्यार्थी यांना कमालीचा त्रास होत आहे. रस्त्‍याच्या दोन्ही बाजूला मोटासायकलची बेशिस्त पार्किंगमुळे सुध्दा अपघाताचा धोका नाकारता येत नाही. या घटनेमुळे आता परत गतीरोधक, दुभाजक व अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!