ChikhaliVidharbha

चिखलीत उद्या विनामूल्य महाआरोग्य नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबीर

– खा. मुकूल वासनिक तथा पदमश्री डॉ. तात्याराव लहाने यांची लाभणार विशेष उपस्थिती

चिखली (तालुका प्रतिनिधी) – ऋषीतुल्य कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांनी अनुराधा नगरी येथील उजाड माळरानावर विविध शैक्षणिक, सहकारी, औद्यागिक तथा अध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणा-या अनेक संस्था उभ्या केल्या. परिसरातील विकासामध्ये मौलाची भर घालणा-या संस्था आज प्रचंड विस्तारत आहेत. परिसरातील गोरगरीबांची, शेतक-यांची, कष्टक-यांची हजारो मुलं, मुली आज इथे शिक्षण घेत आहेत. दिनांक १२ सप्टेंबर रोजी स्व. तात्यासाहेब बोंद्रे हे वैकुंठवासी झाल्यानंतर येणा-या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने तपोभूमी, अनुराधा नगर, चिखली जिल्हा बुलडाणा येथे त्यांनी २२ वर्ष वानप्रस्थामध्ये जेथे व्यतीत केली, त्या त्यांच्या पर्णकुटी या निवासस्थानाच्या बाजुलाच ‘प्रेरणास्थळ’ या त्यांच्या भव्य स्मारकाची निर्मीती अनुराधा परिवाराच्यावतीने करण्यात येत आहे. प्रेरणास्थळाचे भूमिपूजन हे माजी केंद्रीय मंत्री खा. मुकूल वासनिक यांच्या हस्ते संपन्न होत आहे. याप्रसंगी नेत्ररोगतज्ज्ञ व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच आयोजित नेत्रचिकीत्सा व शस्त्रक्रिया विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आयोजित जिल्हाभरातील विविध पक्षांचे तथा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मान्यवर देखील यावेळी उपस्थित राहणार आहे.

ऋषीतुल्य स्व. तात्यासाहेब यांच्या जयंतीदिनी १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘प्रेरणास्थळ’ या भव्य स्मारकाचा भूमिपूजन सोहळा माजी केंद्रीय मंत्री खा. मुकूल वासनिक यांच्याहस्ते अनुराधा नगरीत संपन्न होत आहे. मुंबई येथीली विख्यात वास्तुविशारद संजय पुरी यांनी या प्रेरणास्थळाचे डिझाईनींग केलेले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या या वास्तु विशारदाच्या सदर प्रेरणास्थानाच्या डिझाईनला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मागिल महिन्यातच प्राप्त झाला आहे, हे विशेष. यावेळी बुलढाणा जिल्हा प्रभारी नाना गावंडे, सहप्रभारी दिलीप भोजराज, संजय राठोड, विजय अंभोरे, श्यामभाऊ उमाळकर, आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार सौ. रेखाताई खेडकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खडेकर, जालिंधर बुधवत, काँग्रेसच्या स्वातीताई वाकेकर, ज्ञानेश्वरदादा पाटील, अ‍ॅड. अनंतराव वानखेडे, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे नंदु पालवे, सौ. आरती पालवे यांच्यासह जिल्हाभरातील विविध पक्षांचे तथा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मान्यवरदेखील यावेळी उपस्थित राहणार आहे. अनुराधा परिवाराच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांची जयंती प्रेरणा दिवस म्हणून पाळण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रीया विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबीर प्रसंगी रूग्णांची तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडुन तपासणी व उपचार करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्णांची अल्पोहाराची व मोफत बससेची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर नोंदणी निशुल्क असून शिबीराचा लाभ घेण्याकरीता हिरकणी महिला अर्बन बँक, अनुराधा अर्बन बँक, श्री मुंगसाजी महाराज पतसंस्था, समता अर्बन पतसंस्था, सिध्दविनायक मेडीकल मॉल, या ठिकाणी संपर्क साधावा. तरी जिल्ह्यासह परिसरातील जास्तीत जास्त गरजु रूग्णांनी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अनुराधा परिवार व श्री मुंगसाजी महाराज प्रतिष्ठाणच्यावतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!