चिखली (तालुका प्रतिनिधी) – दरवर्षी शहरातील क्रीडा संकुलात साजरा होणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडी उत्सावाला यंदा पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली पोलिस व क्रीडा अधिकारी कार्यालयाने आपणास परवानगी नाकारली असल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केली असून, प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. भाजपच्या कार्यक्रमातील गर्दी विभागली जाऊ नये, म्हणून हा खोडसाळपणा केला गेल्याचा आरोपही मनसेच्यावतीने करण्यात आला आहे.
दरवर्षी चिखली शहरात गोपाल काल्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य असा दहीहंडी उत्सव साजरा होत असतो. यंदाही ७ सप्टेंबररोजी मोठ्या धुमधडाक्यात मनसेचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार होता. त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना दिनांक २९ ऑगस्टरोजी दहीहंडी उत्सवासाठी क्रीडा संकुलाचे मैदान मिळणेबाबत अर्ज करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे चिखली शहर पोलीस स्टेशन व नगरपरिषद कार्यालय चिखली यांनासुद्धा नाहरकत परवानगी मिळणेबाबत अर्ज दिलेला होता. परंतु, त्याच दिवशी ७ सप्टेंबररोजी शहरात भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सव असून, सदर दहीहंडी उत्सवात सिने अभिनेत्री येत असल्याने सदर कार्यक्रमास प्रचंड गर्दी होऊ शकते. त्यामुळे सदर कार्यक्रमासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मनसे दहीहंडीची परवानगी देता येत नसल्याचे कारण दर्शवून दि.१ सप्टेंबररोजी परवानगी नाकारण्यात आली. मात्र सदर परवानगी नाकारल्याचे पत्र पोलीस प्रशासनाने पदाधिकार्यांस दहीहंडी उत्सवाच्या केवळ २ ते ३ दिवस अगोदर दि. ४ सप्टेंबररोजी दीले. तसेच दरवर्षी नियमित मनसेची दहीहंडी उत्सव हा तालुका क्रीडा संकुलाचे मैदानावरच होत असतो व शहरात भारतीय जनता पार्टी पक्षाची दहीहंडी उत्सव हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होत असतो. मात्र आमच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी तुमचे अगोदर दि.२४ ऑगस्ट रोजी अर्ज सादर केल्याचे कारण दर्शवून प्रथमता त्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे कारण दर्शवीत मनसेच्या दहीहंडी उत्सवासाठी तालुका क्रीडा संकुलाचीसुद्धा परवानगी प्रशासनाने नाकारली.
एवढ्यावरच हा प्रकार थांबला नसून, नगरपालिका प्रशासनाने ना-हरकत प्रमाणपत्र तयार करून त्यासाठी लागणारे शुल्क रक्कम ५०० रुपये दि.०५ सप्टेंबर २०२३ रोजी भरणा करून घेतला. मात्र तद्नंतर काही वेळातच राजकीय दबावापोटी अधिकार्यांनी नाहरकत प्रमाणपत्रावर सही न देता अन्य कारण दर्शवित परवानगी नाकारली. हा सर्व प्रकार राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेला असून, शहरात एकाच दिवशी दोन दहीहंड्या झाल्यास येणार्या नागरिकांची गर्दी विभागल्या जाऊ शकते व आपल्याकडील गर्दी कमी होईल, असा अंदाज भाजपा पदाधिकार्यांना वाटला असावा. मात्र यापूर्वी चिखली शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एकाच दिवशी अनेक वेगवेगळ्या पक्षांच्या दहीहंड्या कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता एकत्रित होत होत्या. मनसेचा केवळ प्रांजळ मनाने हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे तिथी नुसार दहीहंडी उत्सव साजरी करण्याचा हेतू होता. मात्र सत्ताधिकार्यांच्या राजकीय दबावापोटी प्रशासनसुद्धा झुकले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.