– राज ठाकरेंनी अंतरवली सराटी येथे जाऊन घेतली मराठा आंदोलकांची भेट
– ‘कुणबी’चे दाखले देण्यासाठी आता राज्य सरकारची धावपळ?
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजावर भ्याड व नृशंस हल्ला करणे राज्य सरकारच्या चांगलेच अंगलट आले आहे. मराठा समाजाच्या संतापाची धग कायम असून, आज अनेक जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळला जात आहे. छत्रपती संभाजीनगर, सातारा, नांदेड, बारामती, आळंदी, अमरावती येथे व्यापारी पेठांत शुकशुकाट होता. सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने केली जात होती. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी युवानेते अमित ठाकरे यांच्यासह अंतरवली सराटी येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. आपला पक्ष तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी आंदोलकांना सांगून, राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. दुसरीकडे, मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. मराठा समाजाला तातडीने कुणबीचे दाखले देण्यासंदर्भात हालचाली गतिमान झाल्या होत्या. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, आणि ओबीसींची मर्यादा ४० टक्क्यांपर्यंत वाढवा, अशी मागणी आता पुढे आली आहे.
आज छत्रपती संभाजीनगर, सातारा, नांदेड या जिल्ह्यांसह बारामती, निफाड, खेड, आळंदी, चाकण येथेही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला होता. तर अनेक जिल्ह्यात आज तिसर्या दिवशीही एसटी सेवा बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी निदर्शनेही केली जात होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, बंदला गालबोट लागू नये, म्हणून पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. या बंदला वकील असोसिएशनने पाठिंबा दिला असून, व्यापारी संघटनाही बंदमध्ये उतरल्या आहेत. खेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आल्या आहेत. तसेच चाकण आणि राजगुरूनगर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद सुरू आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच, घटनेची सविस्तर माहिती घेतली. राज यांच्यासोबत त्यांचे पुत्र तथा युवानेते अमित ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
महाराष्ट्रात एक नव्हे, तीन जनरल डायर – खा. राऊतांनी डागले टीकास्त्र
महाराष्ट्रात एक नव्हे तर तीन-तीन जनरल डायर आहेत. एक मुख्य जनरल डायर आहे, तर दोन उप आहेत, अशा शब्दांत आज शिवसेना (ठाकरे) नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अंतरवाली सराटीत पोलिसांचा फौजफाटा घुसवून जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान कोणत्या जनरल डायरने फोनवरून सोडले? हे सर्वांना माहित आहे, असे म्हणत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही अप्रत्यक्षपणे आरोप केला.
————–