मुख्यमंत्री प्रशासनासह बुलढाणेकरांच्या दारी; दोन्ही उपमुख्यमंत्री आपआपल्या घरी??
– जिल्ह्याचे नेते माजी पालकमंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही मारली कार्यक्रमाला दांडी!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम स्थानिक शिंदे गटाच्या आमदार व खासदारांनी प्रतिष्ठेचा केल्याने झाला असला तरी, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारल्याने त्यांची अनुपस्थिती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. तर, या कार्यक्रमावर मराठा समाजाने बहिष्कार टाकल्याने सरकारी कर्मचारी, अधिकारी व मोठ्या संख्येने आलेले लाभार्थी सोडले तर सर्वसामान्य नागरिक तुरळक संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. तसेच, या कार्यक्रमापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सरकारने गळचेपी करत त्यांना स्थानबद्ध केल्याने जिल्हावासीयांत संतापदेखील दिसून आला. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याने हा कार्यक्रम भाजप व शिंदे गटाचा शासकीय कार्यक्रम वाटून गेला.
बुलढाण्यात रविवारी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य काही मंत्री उपस्थित होते. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. कार्यक्रमपत्रिकेत नाव असूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आजच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. जालन्यातील लाठीहल्ला प्रकरणामुळे या दोघांनी कार्यक्रमाला येणे टाळले असावे, अशी चर्चा कार्यक्रम स्थळी रंगली होती. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांच्यासह फडणवीस यांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन हेच मंत्री फक्त उपस्थित होते. तसेच, जिल्ह्यातील शिंदे गटाचे व भाजपचे आमदार, खासदार आणि स्थानिक नेते हजर होते. विशेष बाब म्हणजे, अजित पवार उपस्थित राहिले नसले तरी त्यांचे बुलढाण्यातील समर्थक आमदारदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अनुपस्थिती सर्वांना खटकली.
मंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस हे लेह लडाखच्या दौर्यावर असल्याने ते कार्यक्रमाला आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले, तर अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याने तेदेखील उपस्थित राहिले नसल्याचे महाजन म्हणाले. मात्र, अजित पवारांचा दौरा जाहीर करुन ऐनवेळी रद्द करण्यात आला. पवार यांच्या गटातील नेतेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याचे समोर आले. या कार्यक्रमाला अजितदादांनी अचानक दांडी मारल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजितदादांनी कामाचा सपाटाच लावला होता. मात्र अजितदादांच्या सुसाट कार्यपद्धतीला मुख्य सचिवांच्या एका आदेशाने ब्रेक लागला. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून फाइल्स उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील, आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर पोहोचतील, असा निर्णय झाला. त्यामुळे दादा कमालीचे नाराज झालेले आहेत. तसेच, मराठा समाजावरील हल्ल्याने ते संतप्तही झालेले आहेत. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर ते सरकारमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेतदेखील असल्याचे वरिष्ठस्तरीय सूत्राने खासगीत सांगितले आहे.
रस्ता रोकोपूर्वी महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ताब्यात!
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या भीषण लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज रस्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. सकाळी दहाच्या सुमारास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होणार होते. परंतु, बुलढाणा शहर पोलिसांनी हा रस्ता रोको आंदोलन होण्यापूर्वीच नेते आणि कार्यकर्त्यांना रोखले. शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस यांना सकाळी पोलिसांनी घरून ताब्यात घेतले तर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांना सकाळी पोलिसांनी त्यांच्या घरून पोलीस स्टेशनला आणले. काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेत्यांसह जवळपास ३० ते ४० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही जिल्हाभरात उत्स्फुर्तपणे हा रस्ता रोको झालाच, आणि त्यातून जनतेचा संताप दिसून आला.
मराठा समाजावरील हल्ल्याची योग्य चौकशी होणार : मुख्यमंत्री
जालन्यातील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच जे अतिरिक्त अधीक्षक आहेत, त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आले आहे. योग्य ती चौकशी करुन या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जर गरज पडली तर न्यायालयातदेखील जाण्याची आमची तयारी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.
———-