– बुलढाण्यातील कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री दांडी मारण्याची शक्यता?
मेहकर (अनिल मंजुळकर) – जालना जिल्ह्यात मराठा समाजावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, मेहकरहून बुलढाण्याकडे जात असताना मराठा समाजातील तरूणांनी मंत्री संजय राठोड यांचा ताफा हिवरा आश्रम येथे अडविल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी मोठ्या शिताफीने अनर्थ टाळला व मंत्र्यांचा ताफा पुढे जाऊ शकला. दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधा पुकारलेल्या जिल्हा बंदला तालुक्यात चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. दुसरीकडे, बुलढाणा येथील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस हे येणार नसल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मंत्री संजय राठोड हे जात असताना मराठा समाजातील तरूणांनी हिवरा आश्रम येथे मंत्र्यांचा ताफा अडविला व जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रस्त्यावर टायर जाळण्यात आल्याने काहीकाळ तणावही निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी समयसुचकता दाखवून मंत्र्यांसह ताफा पुढे काढला, त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, यावेळी मराठा समाजावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. याप्रसंगी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
घोषणाबाजी सुरू होताच आ. रायमुलकर उठले..!
दरम्यान, राज्य सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने मेहकर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जालना जिल्ह्यात मराठा समाजावर सरकारने केलेल्या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनस्थळी मेहकरचे शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चाही केली. परंतु, यावेळी संंतप्त मराठा समाजाने सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू करताच, आ. रायमुलकर हे हसत हसत तेथून उठले. आमदारांच्या या कृतीची आंदोलनस्थळी चांगलीच चर्चा रंगली होती.
———-