बुलढाणा (बाळू वानखेडे) – ‘तारीख पे तारीख’ ऐकून कंटाळलेल्या जिल्हावासीयांची आता एकदाची प्रतीक्षा संपली असून, आज ३ ऑगस्टरोजी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा येथील आयटीआय समोरील मैदानात होत आहे. प्रशासनाने या कार्यक्रमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने सात लाख हेक्टरवरील पिके धोक्यात आली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून, जिल्ह्यावर कोऱड्या दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकड़ून शेतकर्यांना ठोस मदतीची आस लागून आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली असून, हे दोघेही या कार्यक्रमाला येण्याची शक्यता फार कमी आहे, असे सूत्राने सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी म्हणून परिचित असलेला ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी प्रथम ‘तारीख पे तारीख’ मिळाल्यानंतर आता सदर कार्यक्रम आज बुलढाणा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाड़त आहे. यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून, एक लाखाच्या जवळपास लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देणार असल्याचे प्रशासनाकड़ून सांगण्यात येत आहे. यासाठी ३५० एसटी बसेस बुक केल्याची माहिती आहे तर कार्यक्रमात कोणतीही कसर राहू नये, यासाठी जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे. एकंदरित या कार्यक्रमासाठी शासनाच्या लाखो रूपयांचा चुराड़ा होत आहे.
जिल्ह्यात गेल्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पड़ला. यामुळे हातातील पिके गेली. शासनाने सदर नुकसानीची अद्याप मदत दिली नसल्याची माहिती आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पड़लाच नाही. त्यातही घाटावर पावसाचे प्रमाण कमी आहे. तर घाटाखालील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली, यामुळे लाखभर हेक्टरच्यावर नुकसान झाले. त्याचीही मदत शासनाच्या निकषात अटकत आहे. अशातच गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊसच नसल्याने सात लाख हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, तूरसह इतर खरीप पिके तसेच फळबागा धोक्यात आल्या आहेत. हाती येणारे पीक डोळ्यादेखत वाळत असल्याने शेतकरी चिंतातूर असून, संकटामागून संकटे झेलून तो हतबल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमातून या हतबल शेतकर्यांना कोणता दिलासा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हे सरकार सामान्यांचे व शेतकर्याचे आहे असे मुख्यमंत्री शिंदे हे नेहमीच सांगत असतात. आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असल्याने शिंदे यांनी ठोस मदत जाहीर करावी, अशी जिल्ह्यातील शेतकरी आस धरून बसले आहेत.
या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्याचे मोठे आव्हान शिंदे गटाच्या आमदारासमोर आहे. कारण, मराठा समाजाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तसेच, मराठा बांधवांवर सरकारने अमानुष हल्ला केल्याने इतर ओबीसी-बहुजन समाजदेखील या कार्यक्रमाला जाण्याची शक्यता कमी आहे. तरीही लाभार्थी व शिंदे गटाचे आमदार आणतील तेवढी गर्दी जमण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम यशस्वी करणे ही शिंदे गटाचे आमदार व खासदार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब असली तरी, या नेत्यांनी समाजापेक्षा पक्षाला महत्व दिल्याने नंतरच्या काळात त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
————-