जिल्ह्यात महाविकास आघाडीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न; प्रमुख पदाधिकारी स्थानबद्ध!
– जिल्हाभर उसळली संतापाची लाट; मराठा समाजाचा आज ‘जिल्हा बंद’; सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकशाही मार्गाने आरक्षण मागणार्या मराठा समाजावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अमानुष लाठीमार करून मराठा समाजातील तरूण, लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांवरही हल्ला केला. या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्यावतीनेदेखील जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात येऊन या अमानुष हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येणार होता. या आंदोलनाला सरकार घाबरले असून, त्यांनी पोलिसांमार्फत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. सकाळपासून महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली ठीकठिकाणी स्थानबद्ध केले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा येथे येण्यापूर्वीच पोलिस व प्रशासनाने ही दडपशाही सुरू केल्याने जिल्हाभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, सकल मराठा समाजाने आज ‘जिल्हा बंद’ची हाक दिली असून, सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला आहे. एकही मराठा-बहुजन या कार्यक्रमाला जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली असून, हे दोघेही या कार्यक्रमाला येण्याची शक्यता फार कमी आहे, असे सूत्राने सांगितले आहे.
जालना जिल्ह्यातील मराठा समाज आंदोलकांवरील अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.३) महाविकास आघाड़ीच्यावतीने जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. परंतु, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने या आंदोलनाचा धसका घेतल्याने जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या बळावर हे आंदोलन दडपण्याचा जोरदार प्रयत्न प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात येण्याआधीच कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून प्रशासनाने आंदोलनापूर्वीच महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांना सकाळीच स्थानबद्ध केले. पोलिस व प्रशासनाच्या या कृतीमुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळली असून, ठीकठिकाणी आंदोलने सुरू झाली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड़ तालुक्यात शांततेने व लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते. परंतु या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठ्यांवर राज्य सरकारने लाठीमार व गोळीबार करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शेकड़ो लहान मुले, महिला व वयोवृद्धदेखील गंभीर जखमी झालेत.
या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज, ३ ऑगस्टरोजी महाविकास आघाड़ीच्यावतीने जिल्ह्यात रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाणा येथे येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिस व प्रशासनाने महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांना सकाळीच ताब्यात घेऊन लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन हुकूमशाही मार्गाने दड़पण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जळगाव जामोद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे गजानन वाघ, काँग्रेसच्या विधानसभा पक्षनेत्या स्वाती वाकेकर, तालुकाध्यक्ष उमरकरसह पदाधिकारी, बुलढाणा येथे काँग्रेसचे दत्ता काकससह इतरांना स्थानबद्ध करण्यात आले असून, इतर ठिकाणीही पदाधिकारी यांना स्थानबद्ध करणे सुरू होते. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारच्या या दडपशाहीविरोधात जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, मराठा समाज संतप्त झालेला आहे. दुसरीकडे, सकल मराठा समाजाने आज ‘जिल्हा बंद’ची हाक दिली असून, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केलेला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली असून, हे दोघेही या कार्यक्रमाला येण्याची शक्यता फार कमी आहे, असे सूत्राने सांगितले आहे.
————-