ChikhaliVidharbha

चिखली तालुक्यात ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या नावाखाली महावितरणचा कहर!

– बळीराजा दुहेरी संकटात, पीके आली धोक्यात!
– मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ देणार महावितरण कार्यालयावर धडक

चिखली (कैलास आंधळे) – एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतीपिके धोक्यात आली असतानाच, महावितरणने इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली कहर माजविला आहे. ज्यांच्याकडे सिंचनासाठी पाणी आहे, त्या शेतकर्‍यांना पिकांना पाणी देता येत नाही. रात्री-बेरात्री कधीही लाईट येत असल्याने शेतकर्‍यांना जीव धोक्यात घालून पिके वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात मेरा बुद्रूक, साखरखेर्डा, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील व उपसरपंच हनुमान मिसाळ हे शेतकर्‍यांसह देऊळगावराजा महावितरण कार्यालयावर धडक देणार आहेत.

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द मंडळासह सर्वच मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भरात पिके असताना पावसाने उघाड दिल्यामुळे मेरा बुद्रुकसह परिसरातील मनुबाई, गुंजाळा, चंदनपूर, अंत्री खेडेकर या गावांसह अंढेरा परिसरातील शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, पिंपळवाडी, अमोना या गावांतील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय आहे, त्या शेतकर्‍यांनी पिके वाचवण्यासाठी सिंचनाचा वापर करून धडपड चालवली असताना रात्री-बेरात्री लाईट सोडली जात आहे. तसेच, इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली दिवस व रात्र लाईट बंद केली जात आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सध्या सापडला आहे. मागील जून महिन्यापासून दमदार पाऊस अद्याप या भागात पडला नसून, कोरडवाहू जमिनीवरील पिके सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून फक्त पिके जीवंत राहतील असा पाऊस या परिसरात पडल्याने विहिरी व तलावामध्येसुद्धा पाणी नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. पाच ते सहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह अनेक पिके कडक ऊन पडत असल्याने माना टाकत आहे.


मेरा बुद्रुक परिसरात सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांची कडक तापत असलेल्या उन्हामुळे अवस्था पाहून शेतकरी हवालदिल झालेले असून, हातातोंडाचा घास जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी तुषार संच वापरून पीक वाचवण्यासाठी धडपड करीत आहे तर दुसरीकडे महावितरण इमर्जन्सीच्या नावाने वीज कपात चालू असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. कोरड वाहू शेतकरी तर डोक्याला हात लावून आकाशाकडे बघत असल्याचे चित्र ह्या परिसरात दिसून येत आहे. मेरा बुद्रुक, गुंजाळा, मनुबाई, अंत्री खेडेकर, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, अंढेरा या परिसरातील सोयाबीन फुल व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्याने चार ते पाच दिवसात पाऊस नाही पडल्यास दुष्काळसदृश परिस्थिती या परिसरात निर्माण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!