प्रशांत डिक्करांच्या धक्कातंत्राचा दोन पोलिसांना फटका; एसपींनी केले सस्पेण्ड!
– लघवीला जातो सांगून उपोषण मंडपातून डिक्कर स्वतःच पळून गेले अन् नोकरी दोन पोलिसांची गेली!
– डिक्करांचा राईटहॅण्ड रोशन देशमुखला पोलिसांनी चौकशीसाठी घेतले ताब्यात!
मेहकर/खामगाव (अनिल मंजुळकर) – जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपोषण आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर स्टाईल आंदोलन करण्याचे धक्कातंत्र वापरण्याचा प्रयत्न केला. ३० ऑगस्टच्या रात्री ते उपोषण मंडपातून पळून गेले, व नंतर व्हिडिओ जारी करून आत्मदहनाचा इशारा दिला. डिक्कर यांनी पळून जाताना लघवीला जात आहे, असे सांगितले. डिक्करांचे हे पलायननाट्य उपोषणस्थळी पहारा देणारे पोलिस नाईक शांतीलाल धीरजबस्सी व पोलिस कॉन्स्टेबल निवृत्ती झाल्टे यांच्या नोकरीवर गदा आणणारे ठरले असून, कर्तव्यात कुचराई केली म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी या दोघांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. त्यामुळे डिक्करांच्या धक्कातंत्रामुळे या दोन पोलिस कर्मचार्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत असून, पोलिस अधीक्षकांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली जात आहे. पोलिसांनी डिक्करांचा राईटहॅण्ड असलेल्या रोशन देशमुखला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने महापुरात अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शासन दरबारी केली होती. त्यानंतर याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी २८ ऑगस्टपासून उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला ३० ऑगस्टरोजी महाविकास आघाडीनेसुद्धा पाठिंबा देऊन रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे एक आव्हान निर्माण झाले होते. मात्र ३० ऑगस्टच्या रात्री म्हणजेच ३१ जुलैच्या पहाटे उपोषणकर्ते प्रशांत डिक्कर उपोषण मंडपातून अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली.
दरम्यान, प्रशांत डिक्कर यांना वास्तविक कोणीही पळून नेले नसून तेच स्वतःच पळून गेल्याचे वास्तव त्यांनी स्वतः व्हायरल केलेल्या व्हिडिओवरून सिद्ध झाले आहे. असे असताना सुद्धा दिनांक ३० ऑगस्टच्या रात्री आंदोलनस्थळी पहारा देणारे पोलीस नाईक शांतीलाल धीरजबस्सी आणि पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती झाल्टे यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिनांक १ सप्टेंबररोजी निलंबित केले आहे. सदर दोन्हीही पोलीस कर्मचारी हे आपला पहारा देत होते. त्यातच लघुशंकेला जातो हे कारण देऊन डिक्कर घटनास्थळाहून स्वतःहून पळून गेलेत. तरीदेखील दोन निरपराध पोलीस कर्मर्यांवर निलंबनाची झालेल्या कारवाईविषयी जनमानसात रोष व्यक्त होत असून, त्यांच्याप्रती सहानुभूती मिळत आहे. तसेच त्या दोघांवर झालेली निलंबन कारवाई मागे घ्यावी, अशीही जनमाणसांची भावना आहे. घडलेल्या सर्व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाने डिक्कर यांचा उजवा हात समजल्या जाणार्या रोशन देशमुख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. रविकांत तुपकरस्टाईल आंदोलन करण्याच्या नादात प्रशांत डिक्कर यांच्यामुळे दोन पोलिस कर्मचार्यांच्या नोकरीवर मात्र नाहक गंडांतर आले आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वत्र संतापही व्यक्त होत आहे.
दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई थांबवा, अन्यथा मनसेचा आंदोलनाचा इशारा
जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 28 ऑगस्टपासून स्वाभिमानी संघटनेचे प्रशांत डिक्कर आमरण उपोषणाला बसले होते. दिनांक 30 ऑगस्ट रोजी या ठिकाणी उपोषण मंडपामध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस नाईक शांतीलाल धीरबस्सी व पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती झाल्टे हे रात्रपाळीत उपोषण मंडपात आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी डिक्कर यांनी लघवी करून येतो म्हणून उपोषण मंडपातून निघून गेले. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक यांनी कारवाईत कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली असून, या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई ही चुकीची आहे. डिक्कर यांची ही स्टंटबाजी असते, त्यामुळे या दोन्हीही पोलीस कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, यासाठी दिनांक एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष नागेश भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवरील निलंबन कारवाई मागे न घेतल्यास दिनांक 7 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे उपोषणास बसणार असल्याचे नमूद केले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नागेश भटकर, आनंद सपकाळ,वैभव येनकर, प्रमोद येऊल, रोहित वानखेडे, गोपाल वानखडे, निखिल वानखडे हे उपस्थित होते.