खामगाव (भागवत राऊत) – बनावट सिमेंट तयार करून ते अल्ट्राटेक कंपनीचे म्हणून विकणार्या रॅकेटचा खामगावात पर्दाफास करण्यात खामगाव पोलिसांना यश आले आहे. अल्ट्राटेक कंपनीचे डिटेक्टिव्ह महेश अर्जुन मुखीया (वय २८ वर्ष रा. पालघर) यांनी १ सप्टेंबर रोजी खामगाव शहरात अल्ट्राटेक कंपनीच्या नावावर भेसळयुक्त सिमेंटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्याच माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री उशिरा धाडी घालून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. या घटनेत तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, इतर आरोपी पळून गेले आहेत. पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
अल्ट्राटेक कंपनीच्या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे, विवेक पाटील, ठाणेदार अरुण परदेशी, यांनी सापळा रचून काल, १ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान खामगावच्या सजनपुरी भागातील हॉटेल अजिंक्यच्या मागील एका गोदामावर छापा टाकला होता. पोलीस पाहताच त्यातील एक जण पळून गेला. कंपनीचे डिटेक्टीव्ह मुखीया यांनी गोदामाची पाहणी केली. यावेळी अल्ट्राटेक सिमेंटमध्ये भेसळ करण्यात आले असल्याचे दिसले. पोलिसांनी घटनास्थळावरून मो.सुल्तान मो. हारूण (वय २७ वर्ष रा. निर्मल ऑईलच्या मागे जुना फैल, खामगाव) याला ताब्यात घेवून चौकशी केली. त्याने बायपास वरील कोल्डस्टोरेज जवळ असलेल्या, बर्डे प्लॉट (खामगाव) येथील गोडवूनची माहिती दिली. या तिन्ही गोडवूनमधून भेसळयुक्त सिमेंटच्या ४०० गोण्या, एसीसी सिमेंट भरलेल्या ५०० गोण्या, जाळी, फावडे, टोपले व मशीन असा एकूण २ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक खामगाव विवेक पाटील, शिवाजीनगरचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी, पोलीस उपनिरीक्षक वासाडे रीडर, उपविपोअसा कार्यालय खामगाव, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांबलकर, निलसिंग चव्हाण, देवेंद्र शेळके, संदीप टाकसाळ, थोरात, संतोष वाघ, प्रवीण गायकवाड आदींनी केली आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात चालणार्या सिमेंट भेसळीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या भेसळ रॅकेटमध्ये अनेकजण गुंतले असल्याची शक्यता असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
————-