चिखली (महेंद्र हिवाळे) – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (तालुका अंबड) येथे मराठा आरक्षणासाठी शातंतेच्या मार्गाने उपोषण करणार्या काही आंदोलकांना उपचाराकरीता नेण्याच्या कारणांवरून काल दुपारी उपस्थित झालेल्या वादातून पोलिसांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. सदर आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून दडपण्याचे काम या जुलमी राज्य सरकारने केले असून, आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून गोळीबार केला. यामध्ये शेकडो स्त्री, पुरूष जखमी झाले, राज्यातील या जुलमी व हुकूमशाहीचे प्रतिक असणार्या सरकारच्या निषेधार्थ रविवारी (दि.३) सकाळी १० वाजता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जुलमी सरकारचे मनसुबे हाणून पाडण्याकरीता आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
राज्यातील लोकशाही चिरडून हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची ही पहिली घटना नसून, यापूर्वी वारकर्यांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. पाठोपाठ आता शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या आरक्षणाकरीता उपोषण करणार्या मराठा समाजातील तरूणांवर अमानुषपणे लाठीहल्ला करून लोकशाहीला पायदळी तुडविण्याचे पातक कार्य करण्याचे धोरण राज्यातील दळभद्री सरकारने अवलंबविले आहे. जनता हे फार काळ सहन करणार नसून बुलडाणा जिल्ह्यातील घटक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) हे महाविकास आघाडीच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहे.
सरकारच्या या हुकूमशाहीच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण तालुका स्तरावर रविवारी सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या जुलूमी सरकारचे मनसुबे हाणून पाडण्याकरीता आंदोलनात महाविकास आघाडीतील पदाधिकारी, विविध विभाग, व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाध्यक्ष जालींधर बुधवत, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेश शेळके, प्रसेनजीत पाटील यांनी केले आहे.
https://breakingmaharashtra.in/jalana_maratha_andolan/