– चिखलीत सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखलीतील स्वामी समर्थ केंद्राचे संस्थापक व हिंदू राष्ट्रसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गुळवे यांचे आज (दि.२९) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने स्वामी समर्थ सेवेकरी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये शोककळा निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी जुनेगाव स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. गुळवे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक होते.
दीपक गुळवे यांनी सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला, तसेच ते अनेक सामाजिक चळवळींशी निगडीत होते. चिखली येथे स्वामी समर्थ केंद्राची स्थापना करून त्यांनी स्वामींच्या सेवेकरांसाठी आध्यात्मिक कार्य केले होते. तसेच, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. अखिल भारतीय ग्राहकपंचायत चिखली तालुकाध्यक्ष, हिंदू राष्ट्रसेनेचे जिल्हा सहसंघटक व जिल्हा उपाध्यक्ष, बजरंग दलाचे माजी जिल्हाध्यक्ष, ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ गुरूमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यासह विविध सामाजिक, हिंदू संघटनांच्या कार्यातही त्यांनी विविध पदांवर जबाबदारी सांभाळली होती.
आज (दि.२९) सकाळी राहत्या घरीच दीपक गुळवे यांना हृदयविकाराची तीव्र धक्का बसला. त्यांना तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह चिखलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्ते, त्यांचे परिचित यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जुनेगाव हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्वक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या निधनाबद्दल चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, हिंदू राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
——