‘शोले’स्टाईल आंदोलनाची धास्ती; वंचित आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांची धरपकड!
– पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती ठेवला होता तगडा बंदोबस्त!
बुलढाणा (संजय निकाळजे) – सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हिताच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा देताच, पोलीस प्रशासन अॅलर्ट झाले. सोमवारी (दि.२८) आंदोलन होणार, तोच पोलिसांनी टॉवरसह जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती तगडा बंदोबस्त तैनात केला. आंदोलनाकरिता सतीश पवारसह कार्यकर्ते टॉवरच्या दिशेने निघाले असतानाच, जिल्हा कचेरीसमोर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
स्थानबद्ध करण्यापूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना निवेदन सादर करण्यात आले. सुशिक्षित बेरोजगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होते. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम तोंडावर आल्याने झुकलेल्या प्रशासनाने या पाच, सहा दिवसांत आंदोलन न करण्याची विनंती केली. यामुळे तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या एक लाख स्वाक्षरी घेऊन शासन आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार असल्याचा निर्धार सतीश पवार यांनी जिल्हाधिकार्यांसमक्ष व्यक्त केला. निवेदन शांततेच्या मार्गाने दिले जाईल, असा शब्द दिल्याने खुद्द जिल्हाधिकारी विसपुते यांनी पोलीस बंदोबस्तात मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन देण्यास पाठवू, असे आश्वासन युवा कार्यकर्त्यांना दिले.
स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना आकारण्यात येणारे अवास्तव शुल्क माफ करावे, त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे परीक्षा केंद्र देण्यात यावे, परीक्षेसंदर्भातील यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता परीक्षेची पारदर्शकता कायम राहावी व पेपर फुटीच्या घटना वारंवार होऊ नये, यासाठी सर्वच स्पर्धा परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला देण्यात यावे, या मागण्यांसाठी विविध आंदोलनांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. त्याची पूर्तता होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सतीश पवार यांनी निक्षुण सांगितले. सतीश पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात जिल्हा महासचिव अर्जून खरात, जिल्हा संघटक बाला राऊत, जिल्हा परिषद सर्कलप्रमुख अनिल पारवे, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष संतोष कदम, मेहकर तालुकाध्यक्ष राहुल दाभाडे, लोणार तालुकाध्यक्ष गौतम गवई, चिखली तालुकाध्यक्ष संजय वानखेडे, सदाशिव वानखेडे, गौतम ठेकेदार, प्रल्हाद बनसोडे, किशोर चव्हाण, विकास गायकवाड, विशाल साळवे, सूर्यनंदन जाधव, अनिल पवार, समाधान पवार, विजय पवार, शरद पराग, ईश्वर वानखेडे, बुद्धभूषण जाधव, आकाश जाधव, विकास वानखेडे, ज्ञानेश्वर अंभोरे, महेंद्र सदार, मिलिंद गायकवाड, अमोल सदार, सिद्धार्थ पवार, विशाल मोरे, धीरज सदार, संदीप खंडारे, अक्षय सदार संघपाल सदार, उमेश मोरे, अमोल अंभोरे, संदीप मुळे, अमोल शिंगणे, प्रवीण अंभोरे, राहुल दांडगे, गणेश पवार, नंदकिशोर जायभाये, अनिल अंभोरे, आकाश प्रधान, जीवन अंभोरे, सुभाष काकडे, समाधान पडघान, शैलेश गवई, गजेंद्र वाघ, राहुल जाधव, पवन मिसाळ सहभागी झाले होते.